एकनाथराव खडसे यांचा भा.ज.पा.ला जय श्रीराम? राष्ट्रवादीत प्रवेश करणार!

धरणगाव (उपसंपादक प्रा.पी.एम.पाटील) – महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे भा.ज.पाला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासंदर्भात गेल्या आठ दिवसापासून जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे जळगाव येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी येणार होते परंतु राष्ट्रवादी नेते शरदचंद्रजी पवार यांनी जिल्ह्यातील मोजक्या नेत्यांना मुंबईला बोलावून चर्चा केली. त्यात अतिशय गुप्तता पाळली गेली, कोणतीही बाब ही मात्र मीडियापासून लपवून राहत नाही जरी त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न घेतला गेल्याची सर्वत्र चर्चा करण्याचे आदेश दिले गेले होते तरी विषय हा नेमका नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचाच होता हे निश्चित. सर्वांची मते जाणून घेऊन जो काही निर्णय असेल तो पक्षप्रमुख खा. शरद पवार घेतील असे वृत्त आहे.
आजवरचा इतिहास पाहता ज्या ज्या वेळेस शरदचंद्रजी पवार कोणतीही गोष्ट सांगताना, ‘तसा काही विषय नाही’ असे सांगतील तर त्याचा अर्थ उलटंच असतो. याचा अर्थ असे काही आहे असाच धरावा लागतो आजपर्यंत सर्वांना हे माहीत आहे. नाथाभाऊ यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित असून ऑक्टोबर महिन्यात यांचा निश्चित मुहूर्त निघणार असल्याचे समजते.
यासंदर्भात बुलंद पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी प्रा.पी.एम.पाटील यांनी नाथाभाऊंशी चर्चा केली असता, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासंदर्भात दुजोरा दिला आहे. किमान एक महिन्याच्या आत प्रवेश निश्चित होईल असे खात्रीदायक वृत्त आहे.
राष्ट्रवादीचे नेते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनीही नाथाभाऊंच्या प्रवेशासाठी दुजोरा दिला असून, आमच्या सर्वांचे नेते पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील. नाथाभाउच्या प्रवेशामुळे पक्षाला जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातसुद्धा फायदा होईल, असे सांगितले.
पणन महासंघाचे संचालक संजयदादा पवार यांनी सांगितले की, नाथाभाऊ हे राज्याचे नेतृत्व करणारी व्यक्ती आहे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास त्यांचा पक्षाला निश्चित फायदा होईल.
माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात आमचा एक आमदार निवडून आला आहे. त्यात एकापेक्षा जास्त आमदार निवडून येण्यासाठी नाथाभाऊच्या प्रवेशाने फायदा होत असेल तर त्यात विरोध करण्याचा काहीच प्रश्न नाही भा.ज.पा.ला नाथाभाऊसारख्या नेत्यांची किंमत कळलीच नाही त्यांच्या प्रवेशाने जिल्ह्यातच नव्हेतर राज्यात सुद्धा फायदा होईल.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी सांगितले की, मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे एखाद्या नेत्याचा म्हणजेच नाथाभाऊंच्या प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला फायदा होत असेल तर त्यांच्या पक्षप्रवेशाचे आम्ही निश्चितच स्वागत करून. आमचे नेते पवार साहेबांनी बैठकीत सांगितले. पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील.
या सर्व प्रतिक्रियांमुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा भाजपाला जय श्रीराम म्हणण्याचा विचार ठाम असून, ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे खात्रीदायकरित्या समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here