मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. एन. उर्फ धनंजय नामदेवराव जाधव यांचे निधन

D-N-Jadhav

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – नवी मुंबईत नेरुळमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. एन. उर्फ धनंजय नामदेवराव जाधव यांचे निधन झाले.

आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून धनंजय जाधव यांची ओळख होती. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. धनंजय जाधव यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन 1973 मध्ये भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला. आधी धुळे, नंतर वर्धा, अहमदनगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले.

काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी२००४ ते २००७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम केले. तर २००७ मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. जाधव यांना उत्कृष्ट सेवेबद्दल १९९२ मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी स्वातंत्र्यदिनी पोलीस पदक प्रदान करुन जाधवांचा गौरव केला होता. त्याच वर्षी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सन्मान चिन्ह देऊन धनंजय जाधव यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव केला होता. बुलंद पोलीस टाइम्स परिवारातर्फे माजी पोलीस आयुक्त धनंजय नामदेवराव जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here