विनाकारण फिरणाऱ्यांची जप्त केलेली वाहने संचारबंदी संपल्यानंतरच परत मिळणार

अकोला (प्रतिनिधी) – करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाकडून संचारबंदी घोषित करण्यात आली असून अकोल्यात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. या कारवाईत जप्त केलेली वाहने संचारबंदी संपल्यानंतरच परत देण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी दिली आहे.

राज्यात १ मे पर्यंत संचारबंदी आणि लॉकडाऊनसारखेच कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. करोना रुग्णसंख्येसह मृत्यूही वाढत असल्याने स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे अन्यथा घरीच थांबावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, याकडे नागरिक सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. संचारबंदी असतानाही नागरिकांचा मुक्तसंचार थांबलेला नाही. कोणत्याही नियमांचे पालन न करता विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे. त्यात विनामास्क फिरणारेही बरेच आहेत. बाजारातील गर्दी अद्याप ओसरलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.

अकोला शहरातील महत्त्वाच्या २८ ठिकाणांवर २४ तास पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. सोबत जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त विशेष गस्तीपथके नेमण्यात आली आहेत. त्यात संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर सिटी कोतवाली पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी थेट वाहनेच जप्त करण्यात आली आहेत. ही जप्त केलेली वाहने आता संचारबंदी संपुष्टात आल्यानंतरच संबंधितांना परत देण्यात येतील, असे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here