नोकरीपेक्षा उद्योगधंदे निर्माण करा, उद्योजक व्हा – प्रा भूषण चौधरी

यावल (तालुका प्रतिनिधी डॉक्टर मोहन साळुंखे) : बदलत्या काळासोबत पारंपारिक व्यवसाय व नोकरी यासंबंधीची समाजाची मानसिकता हळुहळु बदलत चालली आहे. नोकरी करण्यापेक्षा काळाची गरज ओळखून स्वतःचा नाविन्यपूर्ण उद्योग स्थापन करून स्वतःसोबत समाज उभारणी व राष्ट्रीय विकासात आपण योगदान देऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्याची स्वप्न बघून ती सत्तेत उतरवण्याची धडपड केली पाहिजे असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या केसिल केंद्राचे डायरेक्टर प्रा भूषण चौधरी यांनी व्यक्त केले.

ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित के आय ई डी सी (इंव्होवेशन अँड इंक्युबेशन डेव्हलपमेंट सेल ) स्थापने संबंधित वेबिनार मध्ये बोलत होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी हित साधून समाज उभारणीसाठी सदैव कार्यरत आहे. शहरी भागा सोबतच ग्रामीण व आदिवासी भागात सुद्धा विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊन आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी मा कुलगुरू डॉ ई वायुनंदन यांच्या मार्गदर्शनाखाली केसिल हे सेंटर सुरू आहे. या केंद्राच्या अंतर्गत धनाजी नाना महाविद्यालयात मा प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा हरीश नेमाडे, डॉ योगेश तायडे यांच्यासोबत विद्यार्थी व परिसरातील उद्योजक यांच्या माध्यमातून केसिल अंतर्गत के आय ई डी सी (इंव्होवेशन अँड इंक्युबेशन डेव्हलपमेंट सेल ) केंद्र स्थापन करण्यात आले. याप्रसंगी प्रा भूषण चौधरी , श्री मनविन चड्डा, श्री निखील कुलकर्णी यांनी वेबिनार च्या माध्यमातून प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी श्री मनवीन चड्डा, सीईओ केसिल यांनी दृक्श्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवउद्योजक होण्याची प्रेरणा दिली.
त्यांनी परिसरातील व देशातील नाविन्यपूर्ण कल्पना सत्तेत साकारून स्वतःसाठी आर्थिक ओघ तयार करून समाज व देशाच्या विकासासाठी योगदान दिलेल्या श्री केसूभाई पटेल, श्री विजय शिखर शर्मा, श्री भावेश अग्रवाल आदींचे उदाहरणे दिली. श्री निखील कुलकर्णी, इंक्युबेशन मॅनेजर यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडे कोणतीही नाविन्यपूर्ण कल्पना असल्यास त्यांनी विद्यापीठाच्या केसिल केंद्राला संपर्क साधून स्वतःचा उद्योग भरभराटीला आणावा यासाठी विद्यापीठाची सर्व टीम सदैव मार्गदर्शन करेल अशी हमी दिली.

यावेळी वेबिनार चे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी मा कुलगुरू व विद्यापीठाच्या केसिल सेंटरच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून महाविद्यालयात केंद्र सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त केले. पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच नवोउद्योजक संकल्पनेतून सुशिक्षित बेरोजगारांची फौज कमी होऊन राष्ट्राच्या विकासात मदत होईल अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य तथा आय क्यू ए सी समन्वयक डॉ उदय जगताप यांनी तर आभार प्रा हरीश नेमाडे यांनी मानले. महाविद्यालयाच्या के आय ई डी सी (इंव्होवेशन अँड इंक्युबेशन डेव्हलपमेंट सेल ) सेंटरचे समन्वयक डॉ योगेश तायडे यांनी कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here