नंदुरबार जिल्हा पोलीस दल भरविणार ‘जनता दरबार’

शहादा (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) : पोलीस व जनता यांच्यातील संबंध वृध्दींगत व्हावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल नेहमीच प्रयत्नशिल असते. त्याचाच भाग म्हणून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील हे दि.२४ मे रोजी जनता दरबार भरविणार आहेत. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्रारी, दाखल गुन्हे, अकस्मात मृत्यु, अदखलपात्र गुन्हे, पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी, जमीनी विषयक वाद, हरविलेले इसम आदींबाबत या जनता दरबारात चर्चा करण्यात येवून प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत.

नंदुरबार जिल्हा पोलीस दल हे नेहमी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात अग्रेसर राहिले आहे. तसेच पोलीस व जनता यांच्यातील संबंध वृध्दींगत व्हावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल नेहमीच प्रयत्नशिल असते. पोलीस दलातर्फे जनतेसाठी नव-नवीन उपक्रम राबविण्यात येतात. जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे विविध सामाजिक कार्यक्रमात जातात. त्यामुळे त्यांना अनेक सामान्य नागरिक भेटून त्यांच्या समस्या सांगतात.

सामान्य नागरिक हे पोलीस ठाण्याला जावून तक्रार करण्यासाठी जाणे टाळतात तसेच त्यांचे तक्रारींचे निरसन होईल किंवा नाही याबाबत सामान्य नागरिक साशंक असतात, त्यामुळे नागरिकांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी तसेच त्यांचे तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यासाठी संपूर्ण पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जनता दरबार भरविण्याचे निश्चित केले आहे. त्याची सुरुवात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यापासून करण्यात येणार आहे.पोलीस व जनता या दोघांमध्ये योग्य समन्वय ठेवणे, तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे हा जनता दरबाराचा मुख्य उद्देश आहे.

नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस विभागाकडील नागरिकांच्या तक्रारी, समस्यांचे निवारण करण्यासाठी दि.२४ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात जनता दरबार आयोजीत करण्यात आला आहे. सदर जनता दरबाराचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील हे स्वत: उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here