योगेश शुक्ल
घरची प्रचंड गरिबी. तरीही निर्धारानं लढा देत समतेची मूल्य रुजवणारे, आंबेडकरी जलस्यातून लोकांना बंधुत्वाची शिकवण देणारे, अख्ख्या जगाला वेड लावणाऱ्या कोळीगीतांचे जनक वरून रांगडा, कणखर, काळा, ओबडथोबड मातीचा, अंतरात परी संत नांदती बोल सांगती मोलाचा’ लोकशाहीर विठ्ठल गंगाराम उमप यांची आज दि. १५ जुलै जयंती.
अठराविश्व दारिद्र्याच्या झळा सोसत, गरिबीचे भांडवल न करणारे आणि समता, ममता आणि बंधुत्वाच्या मार्गावर चालणारे लोकशाहीर विठ्ठल गंगाराम उमप मुंबईतील नायगावच्या बीडीडी चाळीत जन्माला आले. सडपातळ बांधा पण तितकाच ताठ कणा. काळा रंग पण तितकच कलेचे तेज चेहऱ्यावर. हा साधासुधा मुलगा पुढे जाऊन इतिहास घडवेल असे त्यावेळी कोणाला वाटलेही नसेल.
त्यांचे मूळ घराणे विदर्भातले होते कालांतराने ते अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील चिखली येथे स्थायिक झाले. उमप यांच्या वडिलांकडे कलगी – तुरा परंपरेचा गायनाचा वारसा होता. मुंबईत नायगाव परिसरात त्यांचे वडील नोकरी धंद्याच्या निमित्ताने स्थायिक झाले. विठ्ठल उमप यांच्यावर बालवयातच गायनाचे संस्कार झाले. ते गिरणगावातील भजनांमधून अभंग, गौळणी गावू लागले. आंबेडकरी जलशांचाही फार मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. वयाच्या आठव्या वर्षांपासूनच त्यांना गायनकलेची आवड निर्माण झाली. १९५६ पासून ते आंबेडकरी जलशांमध्ये कव्वाली गायन करू लागले. सुमारे ५० वर्षे त्यांनी आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमात गायन केले.
त्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांमध्ये लोकगीतांतून, पथनाट्यांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होते. विठ्ठल उमपांनी हेच कार्य पुढे चालू ठेवलं. पोवाडे गायनाची कला त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली. महाराष्ट्रासाठी, या देशासाठी काहीतरी करावं त्यांचा ध्यास होता. तब्बल ३० वर्षे त्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र एड्स नियंत्रण मंडळ अशा शासकीय संस्थांच्या प्रचार मोहिमांमधून समाज प्रबोधनपर गायन केले. टुंब नियोजन, कुटुंब कल्याण, दारूबंदी, बालशिक्षण, व्यसनमुक्ती अशा योजनांचा प्रचार-प्रसार आपल्या कलेतून त्याकाळी ते करत असत. लोकगीतांद्वारे समाज प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम करत कलेतून सामाजिक भानही जपले.
सुरुवातीला बीडीडी चाळीतील गोपाळ खडकांच्या कव्वाल पार्टीत सहाय्यक गायक म्हणून ते काम करू लागले. मुंबईत काहीतरी स्वतःचे करावे, गाण्यामध्ये आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण व्हावे यासाठी उमप स्वतःला आजमावू लागले. उमपांनी पुढे स्वतःची गायन पार्टी काढण्याचे ठरवले. त्या पहिल्या गायन पार्टीच नाव रमेश गायन पार्टी असे होते. अर्थातच तेव्हाचा काळ हा संघर्षाचा होता, उमेदीचा होता. घरात आजारी आई-वडील आणि कमवता कुणीही नसताना उपजिविकेचे साधन म्हणून लोखंड वाहिले. चणे विकले. मात्र पोटासाठी ही कामे करीत असतानाच गाण्याच्या क्षेत्रात काहीतरी करण्याचे त्यांनी निश्चित केले. त्यांना कार्यक्रम मिळू लागले. पुढे बाबांनी रमेश गायन पार्टीचे नाव बदलून विठ्ठल उमप अँड पार्टी असे केले. नंतर काही वर्षांनी त्यांनी पोस्टात तारवाल्याची नोकरीही केली. ती नोकरी करत असतानाच गाणेही गुणगुणणे सुरू होते.
गायक म्हणून त्यांची जडणघडण सुरू झाली होती. धोबी तलावच्या बिर्ला मातोश्री रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायक मन्ना डे यांनी दादांचं गाणं ऐकलं आणि मन्नादांच्या तोंडून कौतुकाचे उद्गार निघाले… आप बहोत ऊंचा सूर में गाये है. हमें भी उंचा गाना पडेगा. या कौतुकाने विठ्ठल उमप भारावले होते. १९६२मध्ये त्यांचं पहिलं व्यावसायिक कोळी गीत रेकॉर्ड झालं. मुंबईच्या कोळीवाड्यात उमपांचं जाणं-येणं असायचें. लहानपणी ते आईसोबत नायगाव, भोईवाडा, कोळीवाड्यात ते जायचे. बालवयात पाहिलेल्या त्या मासळी बाजारातील विश्व त्यांनी आपल्या डोळ्यात साठवलं होतं. त्यांची निरीक्षणशक्ती प्रचंड होती. त्यांच्या मित्रांबरोबर कोळीवाड्यात जाणे-येणे वाढले. कोळी महिलांशी संवाद होऊ लागले. व्यवहार होऊ लागले. त्या साऱ्या लकबी त्यांनी गाण्यांमधून मांडल्या. अभ्यासपूर्ण एकापेक्षा एक गाणी त्यांनी रचली.
अख्ख्या जगाला वेड लावणारं ‘ये दादा आवर ये’ हे कोळीगीत त्यांनी रचलं. मुंबईत त्याकाळी असा एकही कोळीवाडा शिल्लक राहिला नाही, जिथे विठ्ठल उमप यांचा कार्यक्रम झाला नाही. कोळीगीतांमुळे उमप लोकांच्या गळ्यातील ताईत झाले. मुंबईतल्या कोळीगीतांचे ते जनक ठरले. मुंबईसारख्या शहरात लोककलेचा आणखी एक पारंपरिक बाज विठ्ठल उमप यांनी या मुंबईला, पर्यायाने भारताला दिला
एच. एम. व्ही., व्हीनस, टी सिरीज, सरगम, स्वरानंद, सुमित आदी ध्वनिमुद्रिका कंपन्यांसाठी त्यांनी लोकगीते, कोळीगीते, पोवाडे, भारुडे, गोंधळ गीते अशा विविध स्वरूपाचे गीतगायन केले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांची २०० च्या वर ध्वनीमुद्रित गीते उपलब्ध आहेत. फू बाई फू, लग्नाला चला, नेसते नेसते पैठणी साडी, चिकना चिकना माव्हरा माझा, ये दादा आवार ये, माझ्या भीमरायाचा मळा, होता तो भीम माझा, बोबडी गवळण, आज कोळी वाऱ्यात अशी अनेक लोकगीते त्यांनी गाऊन लोकप्रिय केली आहेत .ते कलाकार होते पण त्यांच्या सामाजिक जाणीवा अत्यंत तीव्र होत्या. त्यांच्या गाण्यातून ते दिसून यायचं. १९६९ मध्ये तर ते थेट इंदिरा गांधींना भेटून त्यांनी त्यांना मागासवर्गीयांच्या मागण्या सादर केल्या होत्या.
शाहीरी करता करता त्यांनी अनेक मोठ्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या. त्यातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मुंबई विद्यापीठात ते लोककला अकादमीचे ते सल्लागार होते. नभोवाणीच्या लोकसंगीत विभागाचे परीक्षक होते. केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र बोर्ड आणि भारत सरकारच्या नियोजन आयोगाच्या सांस्कृतिक विभागाचे ते सभासद होते. महाराष्ट्र सरकारच्या विठाबाई भाऊ नारायणगावकर गौरव समितीचेही ते सभासद होते.
कॉर्क आयर्लंड येथे १९८३ साली आयोजित झालेल्या २५ राष्ट्रांच्या लोककला महोत्सवात लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी सहभाग घेतला होता. १९६७ झाली इंदिरा गांधी यांच्यापुढे त्यांनी हिंदी भाषेत मागासवर्गीयांच्या मागण्या सादर केल्या होत्या. १९७७ साली तालवाद्य सम्राट अण्णा जोशी यांच्या ‘महाराष्ट्राचं लोकसंगीत’ या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. १९८७ साली नागालँड येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे तत्कालीन संचालक प्रा. कमलाकर सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सादर करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली होती. १९८९ साली भारत सरकार द्वारा आयोजित अपना उत्सवात त्यांनी कार्यक्रम सादर केला. दिल्लीच्या विज्ञान भवनात स्वरचित लोकनाट्य सादर केले. सोलापूर येथे आयोजित झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी फू बाई फू या भारुडासह त्यांची लोकप्रिय लोकगीते सादर केली.
खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी केवळ गाणीच गायली नाही किंवा ते केवळ गायक, शाहीरच नव्हते. तर त्यांनी नाटक लिहिलं आणि नाटकांमध्ये कामही केलं. टीव्ही मालिका, सिनेमांमधूनही त्यांनी अभिनय केला आणि पुस्तकांचं लेखनही केलं. उमाळा हा गझल संग्रह, गीत पुष्पांजली, माझी वाणी, भीमा चरणी, असा मी झालॊ आंबेडकर, पहिल्या धारेची, माझी आई भीमाई, रंगशाहिरीचे, त्यांचं ‘फू बाई फू’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
लोकशाहीर विठ्ठल उमप केवळ गझलकार, गीतकार, लोकगायकच नव्हते तर ते उत्तम अभिनेते होते. लोकाविष्कारांवर आधारित नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविला . इंडियन नॅशनल थिएटर लोकप्रयोज्य कला संशोधन केंद्रातर्फे रंगभूमीवर आलेल्या अबकडुबक, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, अरे रे संसार, मातीचं स्वप्न या नाटकांतून त्यांनी सूत्रधारासह अनेक महत्वाच्या भूमिका साकार केल्या. खंडोबाचं लगीन मधील सूत्रधार आणि जांभूळ आख्यान मधील द्रौपदी या त्यांच्या भूमिका मराठी रंगभूमीवरील अविस्मरणीय भूमिका ठरल्या. ‘भारत एक खोज’, ‘महापर्व’, ‘पाऊस मृगाचा पडतो’, ‘सागर की गोद में’ आणि ‘कोंडामार’ आदी मालिकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं. ‘अबक दुबक तिबक’, ‘खंडोबाचं लगीन’, ‘अरे संसार संसार’, ‘जांभूळ आख्यान’, ‘गाढवाचं लग्न’, ‘दार उघड बया दार उघड’, ‘बुद्ध सरणं’, ‘विठो रुखमाई’ या नाटकांतून आणि ‘आहेर’, ‘पायगुण’, ‘देवता’, ‘अन्यायाचा प्रतिकार’, ‘भीमगर्जना’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘जन्मठेप’, ‘बळीचं राज्य येऊ दे’ आणि ‘बघ हात दाखवून’ अशा अनेक नाटकांमधून – मालिकांमधून त्यांच्या अभिनय कौशल्याचे दर्शन घडले. आहेर, पायगुण, अन्यायाचा प्रतिकार, भीमगर्जना, अश्व, कंकण, जन्मठेप, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बळीचं राज्य येऊ दे, टिंग्या, विहीर, नटरंग, गलगले अशा अनेक चित्रपटांमधून लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी काम केले.
मधुकर पाठक, श्रीनिवास खळे, राम कदम, श्रीधर फडके, अमर हळदीपूर, राम लक्ष्मण, दत्ता डावजेकर, अच्युत ठाकूर, यशवंत देव अशा संगीत दिग्दर्शकांसोबत काम करण्याची, गायनाची संधी लोकशाहीर विठ्ठल उमप यांना प्राप्त झाली. १९९६ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला. दादू इंदुरीकर स्मृती पुरस्कार आणि पद्यश्री दया पवार स्मृती पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. सन २०१० साली भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार, २००५ साली जांभूळ आख्यान नाटकासाठी मटा. सन्मान पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. विठ्ठल उमप यांना दोन मुली आणि चार मुले आहेत. त्यांचे पुत्र भास्कर, आदेश, उदेश, संदेश, नंदेश, हे विठ्ठल उमप यांची शाहिरीची परंपरा पुढे चालवित आहेत. दोन मुली संगीता आणि कविता. त्यांचे दोन विवाह झाले होते. लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या समर्थ लोकगीत गायनातून तसेच शैलीदार अभिनयातून मराठी रंगभूमीवर, लोकरंगभूमीवर तसेच रुपेरी पडद्यावर आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे.
२६ नोव्हेंबर २०१० रोजी नागपूर येथे खाजगी वाहिनीच्या उद्घाटन समारंभात भीमगर्जना आणि बुद्धवंदना करीत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.