पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : चोरट्यांनी अवघ्या चार मिनिटात अकरा लाखांचे मोबाईलवर हात साफ केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील धायरी गावांमध्ये घडली. सीसीटीव्हीच्याआधारे अज्ञात दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी शुक्रवारी पहाटे झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास कटावणीच्या सहाय्याने दुकानाच्या शटरचे सेंटर लॉक उचकाटून दुकानामध्ये प्रवेश केला. अवघ्या चार मिनिटांमध्ये एका पोत्यामध्ये दुकानातील ओप्पो, सॅमसंग, रेडमी, विवो, वन प्लस, लेनोवो, जिओ कंपन्यांचे मोबाईल फोन टॅबलेट व स्मार्ट वॉच असे जवळपास ६१ मोबाईल व इतर वस्तू चोरून नेले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व मोबाईल जवळपास ११ लाख रुपये किंमतीचे आहेत.
चोरट्यांनी पूर्ण तोंड कपड्याने झाकून घेतले होते व अंगावरती पांढऱ्या रंगाचा नाईट सूट परिधान केले असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. चोरटे आजूबाजूच्या दुकानामध्ये असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये दुचाकी वरून जात असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.