योगेश शुक्ल
एखादा अभिनेता आयुष्यभर चित्रपटात काम करूनच प्रसिद्ध होतो. कधी कधी चित्रपटातील छोटी छोटी पात्रेही लोकांच्या हृदयात आपली छाप सोडतात. असेच एक पात्र म्हणजे ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील मकसूद भाई. सफाई कामगाराचे हे पात्र लहान होते पण चित्रपटात मुन्नाभाईकडून मिळालेली जादू की झप्पी आजही अनेक चित्रपटरसिकांच्या लक्षात आहे. मकसूद भाईचे हे पात्र पडद्यावर जिवंत करणारे अभिनेते सुरेंद्र राजन #surendra_rajan यांचा आज दि. १९ जुलै जन्मदिवस.
सुरेंद्र राजन हे केवळ मकसूदभाईच्या पात्रासाठीच नाही तर बॉलिवूड गांधी म्हणूनदेखील ओळखले जातात. त्यांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर चक्क ९ वेळा लघुपट व चित्रपटातून महात्मा गांधी साकारले आहेत. सुरेंद्र राजन यांचा जन्म १९ जुलै १९३९ ला मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील अजयगड येथे झाला. त्यांचे आजोबा गावातील समृध्द जमीनदार होते. अजयगडच्या राजघराण्याच्या जवळचे समजले जाणाऱ्या या घराण्यात जन्मलेल्या सुरेंद्र यांना लहानपणापासूनच निसर्गाबद्दल खूप उत्सुकता होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरेंद्र राजन यांनी बॅचरल ऑफ सायन्ससाठी प्रवेश घेतला पण तो अभ्यासक्रम पूर्ण न करता त्यांनी कला व चित्रकलेचा अभ्यास करण्यासाठी लखनऊ येथील कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९८३ पर्यंत कलाकार, चित्रकार आणि छायाचित्रकार म्हणून काम केले. यात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीच्या फोटोग्राफीविभागातील ३ वर्षांच्या कालावधीचा समावेश आहे. त्यानंतर भारत भवन भोपाळ येथे त्यांनी अधिकारी म्हणूनही काम केले. मध्यप्रदेशाच्या आदिवासी लोककला परिषदेचे प्रथम सचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. या कालावधीत त्यांनी आदिवासी कलाकारांच्या उत्कर्षासाठी कार्य केले. कलाप्रवासात छायाचित्रकार म्हणून रघु रॉय यांच्या आंतरराष्ट्रीय ग्रुपचे ते सदस्य आहेत. राष्ट्रीय स्तरावरील चित्रकारांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. चित्रकला आणि मूर्तिकलेतील अनेक पुरस्कारदेखील त्यांना मिळाले आहेत.
लहानपणापासून फिरण्याची आवड असणाऱ्या सुरेंद्र राजन यांनी १९८३ ला कारकिर्दीच्या शिखरावर असतांना देशाच्या विविध भागात फिरण्याचा निर्णय घेतला व मित्रांच्या मदतीने घेतलेल्या फियाट कारमधून देशाच्या विविध भागात प्रवास केला. यावेळी त्यांनी चित्रकला व कलावस्तू बनविण्याची आवडही जोपासली. सहा वर्षे फिरस्ती केल्यानंतर त्यांच्या कलाविषयक अभ्यासामुळे प्रकाश झा यांच्या परिणती (१९८९) या चित्रपटाच्या कला दिग्दर्शनासाठी त्यांना बोलावणे आले. या चित्रपटासाठी स्टली फोटोग्राफीदेखील ते करत होते. एक दिवशी सेटवर मेकअपमन आला नाही तर सुरेंद्र राजन यांनी ती ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. या चित्रपटातील भोपा या भूमिकेकरिता अभिनेता मिळत नव्हता म्हणून अभिनेत्री सुरेखा सीकरी आणि प्रकाश झा यांनी ती भूमिका सुरेंद्र राजन यांनी करावी अशी गळ घातली. हो नाही करता करता ती भूमिका सुरेंद्र राजन यांनी करुन रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. याच माध्यमातून इन विच ॲनी गिव्हस इट दोज वनस (१९८९) या चित्रपटातील चपराशाची भूमिका चालून आली. परिणिती चित्रपटातील अभिनय पाहून अरुंधती रॉय यांनी त्यांच्या इलेक्ट्रीक मून (१९९२) या चित्रपटातील जॉन्स्टनच्या भूमिकेसाठी सुरेंद्र राजन यांना बोलावणे पाठवले. अरुंधती रॉय यांचा आग्रह मोडता न आल्याने, सुरेंद्र राजन यांनी ती भूमिका स्वीकारली. मात्र या भूमिकेसाठीत्यांना दाढी काढावी लागणार होती. मात्र सुरेंद्र राजन यांनी जीवनातील २८ वर्षे दाढी काढलीच नव्हती, पण भूमिकेसाठी त्यांनी दाढी कापली. या अनुभवाबाबत ते सांगतात की, दाढी केल्यानंतर मी स्वतःलाच आरशात ओळखले नाही.
इलेक्ट्रीन मून या चित्रपटातील सुरेंद्र राजन यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते अनेक वृत्तपत्रातून – मासिकांमधून त्यांचे फोटो प्रसिध्द झाले होते. १९९७ ला भारताच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभातील सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी वामन केंद्रे यांच्याकडे होती. या समारंभातील स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमिकांसाठी कलावंतांचा शोध सुरु होता. जवळपास सर्वच कलावंत मिळाले मात्र महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी योग्य कलावंत मिळत नव्हता. वामन केंद्रे एनएसडीमध्ये असतांना सुरेंद्र राजन फोटोग्राफी विभागात कार्यरत होते. त्यांना अचानक सुरेंद्र राजन यांची आठवण झाली. दरम्यान इलेक्ट्रीक मून चित्रपट केल्यानंतर सुरेंद्र राजन फिरस्थीवर निघाले होते. त्यांचा पत्ता कोणाचकडे नव्हता. अखेरीस वामन केंद्रे यांनी त्यांना शोधण्यासाठी दिल्लीला फोन करुन दोघांच्या जवळच्या मित्रांकडे निरोप ठेवला. सुरेंद्र राजन कुठे सापडले तर त्यांना तातडीने मुंबईला पाठवा. सुदैवाने त्याच काळात काही कामानिमित्ताने सुरेंद्र राजन दिल्लीत आले होते. दिल्लीत जो पण भेटे तो त्यांना वामन केंद्रेचां निरोप देत असे की, तुम्हांला महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी मुंबईला बोलावले आहे. अखेरीस संपर्क झाला आणि महात्मा गांधींच्या भूमिकेकरिता १५ दिवसांपासाठी सुरेंद्र राजन मुंबईला आले. त्यांच्या या भूमिकेची रंग व वेशभूषा केली होती हॉलिवूडच्या गांधी चित्रपटाच्या ऑस्करविजेत्या वेशभूषाकार भानू अथय्या यांनी. त्यानंतर सुरेंद्र राजन यांना अभिनयाच्या अनेक ऑफर चालून आल्यात. फिरस्तीची आवड असणारे सुरेंद्र राजन केवळ १५ दिवसासाठी मुंबईल आले म्हणता म्हणता नंतर १५ वर्षे मुंबईतच रमले.या दरम्यान सुरेंद्र राजन मुंबईतील गोरगाव इस्टमधील एनएनपी कॉलनीतील एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहत होते.
या १५ वर्षांच्या कलाप्रवासात सुरेंद्र राजन यांनी तक्षक (१९९९), द लिंजेड ऑफ भगतसिंग (२००२) मधील महात्मा गांधी, मुन्नाभाई एम.बी.बी.एस. (२००३) मधील मकसूदभाई, पहेली (२००५), शहर (२००५) मधील मुस्लिम वेटर, श्याम बेनगेल यांच्या नेताजी सुभाषचंद्र बोस – द फॉरगॉटन हिरो (२००५) मधील महात्मा गांधी, लगे रहो मुन्नाभाई (२००६) मधला ग्रंथपाल हरिराम, द केबिन मॅन (२००७) हा लघुपट, खोया खोया चाँद (२००७) मधला डॉक्टर, धमाल (२००७), फिर कभी (२००८) मधले त्रिपाठी सर, इएमआय – लिया है तो चुकाना पडेगा (२००८), फस गये रे ओबामा (२०१०) मधला चाचा शास्त्री, मर्डर २ (२०११) मधील आजोबा, आर राजकुमार (२०१३) मधील म्हातारा, जॉली एलएलबी (२०१३) मधील जॉलीचे वडील, गुमनामी (२०१९) मधील महात्मा गांधी साकारले. या शिवाय बंदिनी (२००९ – २०११) या मालिकेतील महादेव सोळंकीचे पात्र, बोस डेड ऑर अलाइव्ह (२०१७) ये बेवसिरीजमधील महात्मा गांधी, स्पेशल ओपीएस (२०२०) मधील ड्रायफ्रूट दुकानाचा मालक या भूमिका केल्यात. त्यांच्या केबिन मॅन मधील भूमिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. बीबीसीच्या द लास्ट डे ऑफ राज मध्ये महात्मा गांधी, इंडियन नॉक्टर्न या इटालियन चित्रपटात, द इंडियन या रशियन चित्रपटात तर वन नाईट विथ द किंग या हॉलिवूड चित्रपटात हिब्रू धर्मगुरुची भूमिका केली आहे. क्वीन्स वर्ल्ड फिल्म फेस्टीव्हल २०११ मध्ये द एक्लिप्स ऑफ तारेग्ना या लघुपटातील भूमिकेकरिता त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
वयाची ७५ पूर्ण होताच हिमालयात जाऊन राहण्याच्या इच्छेनुसार त्यांनी गढवालजवळील एका छोट्याशा गावात भाड्याने घर घेतले . तिथे राहून आयुष्यभराच्या अभ्यासाचे मंथन करणे व वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करण्याचा त्यांचा विचार होता. दरम्यान मिळालेली शेवटची वेबसिरीज पूर्ण करण्याचा विचार करुन ८० वर्षाचे सुरेंद्र राजन मुंबईत आले. मात्र ज्या वेबसिरीजसाठी ते मुंबईत आले होते ती कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे लांबली सर्वच शुटींग रद्द झाल्याने व काम नसल्याने सुरेंद्र राजन मुंबईतच अडकले. त्यावेळी अभिनेता सोनू सूदने त्यांना त्यांच्या सतना गावी जाण्यासाठी मदत केली. सद्यस्थितीत सुरेंद्र राजन आपल्या गढवाल येथील घरात राहतात. तीन महिन्यांनी एकदा जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी शहरात येतात. या हरफनमौला अभिनेत्यास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!