ज्येष्ठ पत्रकार आणि माजी माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचे निधन

dilip-dharurkar-दिलीप-धारूरकर

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : राज्याचे माजी मुख्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचे आज (1 ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

देवगिरी तरुण भारतचे संपादक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेले दिलीप धारूरकर यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. धडाडीचे पत्रकार म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. दैनिक तरुण भारत मध्ये काम करताना त्यांनी अनेक पत्रकार घडवले. देशामध्ये माहिती अधिकार लागू झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या अचानक निधनामुळे अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.

 

ज्येष्ठ पत्रकार, संपादक तथा राज्याचे माजी मुख्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांच्या निधनामुळे परखड पत्रकार आणि विचारवंत असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारुरकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे. ‘अभ्यासू पत्रकार, संपादक म्हणून धारुरकर यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. स्तंभलेखक, उत्तम वक्ते म्हणून ते परिचित होते. राज्याचे माहिती मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून धारुरकर स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारूरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले कि, “माजी माहिती आयुक्त, ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. विदर्भात माहिती आयुक्त म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आणि इतरही भागातील प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्यासाठी मोठा पुढाकार त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतला. राष्ट्रवादी विचारांना बळकटी देणारे मोठे लेखन कार्य त्यांनी केले. एक उत्तम संपादक, वैचारिक स्तंभलेखक म्हणून ते कायम स्मरणात राहतील.”

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here