मेरठ (उत्तरप्रदेश) : मकरसंक्रातीनिमित्त अनेक ठिकाणी मोठमोठे पतंग उत्सवही भरवण्यात आले होते.पण सोन्याचा पतंगही उडू शकतो का, सोन्याचा धागाही असू शकतो का? पुलीही सोन्याची असू शकते का? या गोष्टी तुम्हाला अतिशयोक्ती वाटतील, पण असा पतंग यूपीच्या मेरठमध्ये तयार करण्यात आला आहे, जो निव्वळ सोन्यापासून बनवला आहे.
मेरठमध्ये झालेल्या इन्व्हेस्टर्स समिटमध्ये आलेल्या मंत्र्यांनाही सोन्याच्या पतंगाची दोरी धरण्याचा मोह आवरता आला नाही. यूपी सरकारमधील एमएसएमई मंत्री आरके सचान यांनी सोन्याचा पतंग असलेला स्टॉल पाहिला तेव्हा त्यांनी सोन्याच्या पतंगाची तार पकडली. दुसरी व्यक्ती सोन्याचा पतंग घेऊन दुसऱ्या बाजूला उभी होती.
जेव्हा मंत्र्याने या सोन्याच्या पतंगासोबत सेल्फी काढला तेव्हा मेरठचे जिल्हा दंडाधिकारी दीपक मीना यांनाही सोनेरी पतंगासोबत सेल्फी घेण्यापासून स्वतःला रोखता आले नाही. मंत्री आणि डीएम यांनी याचे कौतुक केले. मंत्री आर.के.सचन म्हणाले की, त्यांनी अनेक पतंग पाहिले आहेत, पण सोन्याचा पतंग पहिल्यांदाच पाहिला.
यावेळी प्रजासत्ताक दिन आणि बसंत पंचमी एकत्र आल्याने सोन्याचे पतंग तयार केल्याचं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रजासत्ताक दिन आणि बसंत पंचमीच्या संगमानिमित्त मेरठच्या थापर नगरमध्ये सोन्याचे पतंग उडवले जाणार आहेत. या पतंगाची किंमत एकवीस लाख आहे. एकवीस लाख किमतीचा हा पतंग पूर्णपणे सोन्याचा आहे.