मालगाडीच्या डब्यांचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी साखरेची तब्बल १२३ पोती केली लंपास

crime
file photo

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर-दौंड कॉर्डलाईन रेल्वे मार्गावर सारोळा कासार (ता. नगर) रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या डब्यांचे लॉकर तोडून अज्ञात चोरट्यांनी साखरेची तब्बल १२३ पोती लंपास केली. चोरलेली सदर साखरेची पोती चोरट्यांनी रेल्वेमार्गालगत असलेल्या शेतातील मक्याच्या पिकात लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहेत.

नगर-दौंड रेल्वेमार्गावरील सारोळा कासार स्टेशन जवळ मालगाडीचे डबे फोडून त्यातील मालाच्या चोरीच्या घटना सातत्याने होत असतात. त्यामुळे या परिसरात नेहमी रेल्वे पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असतात. अशाच प्रकारे मालगाडीचा एक डबा चोरट्यांनी फोडून त्यातील साखरेची पोती चोरून नेल्याचे निदर्शनास आले होते. गस्त घालणारे हेड कॉन्स्टेबल बापू घोडके आणि सुनील मराठे यांनी दौंड लोहमार्ग पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे नगर व दौंड येथून लोहमार्ग पोलिस अधिकाऱ्यांसह पथके घटनास्थळी दाखल झाली.

या चोरीचा तपास करत असताना आणि रेल्वे स्टेशन परिसरात सर्वत्र शोधाशोध करत असताना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे मार्गापासून सुमारे २०० मीटर अंतरावर रेल्वे परिसराबाहेरील असलेल्या शेतात साखरेची पोती काळ्या ताडपत्रीमध्ये झाकून ठेवलेल्या स्थितीत आढळून आली. पोलिस कर्मचार्‍यांनी त्यांची मोजणी केली तेव्हा दोन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास १२३ साखरेची पोती आढळून आली. ही पोती शेतात कोणी आणून ठेवली याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. १२३ पोत्यांचे साधारणपणे ६१५० किलो वजन असून, याची किंमत एक लाख ९० हजार ६५० रूपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here