छपरा (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारपासून २८ जणांचा मृत्यू झाला. तर १२ हून अधिक लोकांना अंधत्व आलं आहे. अनेकांना गंभीर अवस्थेत पाटणा येथे उपचाराचासाठी पाठविण्यात आलं आहे. सिवानमध्ये २० जणांचा तर छपरामध्ये २ जणांचा मृत्यू झाला. याबाबत प्रशासनाकडून अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आला.
जिल्ह्यातील भगवानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मगर गावात पॉलिथिनमधून विक्री होणारी विषारी दारू प्यायल्यानं अनेकांची तब्येत बिघडली. उलट्या, पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर दारू पिणाऱ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दारू सिवानमधील मृतांची संख्या वाढून २४ झाली आहे. तर सारण जिल्ह्यातील इब्राहिमपूर गावात विषारी दारू प्यायल्यानं ४ जणांचा मृत्यू झाला.
पीडित कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दारू प्यायल्यानंतर काही तासांतच काही जणांची प्रकृती बिघडली. त्यामधील तिघांचा बुधवारी तर आज सकाळी एकाचा मृत्यू झाला. पोलिसांकडून कारवाई होईल, या भीतीनं काही कुटुंबीयांनी पीडितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ४८ जणांचा प्रकृती गंभीर आहे. त्यामध्ये सिवानमधील २८ आणि सारणमधील १० जणांचा समावेश आहे.
सारण प्रशासनाने विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. सरणचे जिल्हाधिकारी म्हणाले,” आम्ही शवविच्छेदन आणि व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत आहोत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत २ जणांना अटक केली.
सिवानमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कारवाई करत भगवानपूर हाट पोलीस स्टेशनचे प्रमुख आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तर ९ जणांना अटक करण्यात आली आहे. रुग्णालय आणि बसंतपूर आरोग्य केंद्राला अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. रुग्णांना तातडीनं दाखल करण्याकरिता रुग्णवाहिकाही तयार ठेवण्यात आली आहे.