लखनौ (उत्तरप्रदेश) : कन्नौज जिल्ह्यातून ७ मुलांची आई तिच्या बॉयफ्रेंडसह पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या सातही मुलांना घरी ठेवून ती पळून गेली. जेव्हा मुलांना हा भयंकर प्रकार समजला तेव्हा त्यांनी आपल्या आत्यासह पोलीस ठाणं गाठलं. मुलांनी पोलिसांकडे आपल्या आईला शोधण्याची विनंती केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हे संपूर्ण प्रकरण कन्नौज जिल्ह्यातील गुरसहायगंज कोतवाली भागातील एका गावातील आहे. या गावात राहणारा एक ४० वर्षीय व्यक्ती कामानिमित्त बाहेर असतो. त्याची पत्नी आपल्या ७ मुलांसह गावात राहत होती. याच दरम्यान पत्नीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, असं सांगितलं जात आहे.
काल पत्नीने संधी साधत बॉयफ्रेंडसह घरातून पळ काढला. आई घरी न परतल्याने मुलांनी आत्याला याबाबत माहिती दिली. आत्या सर्व मुलांसह गुरसहायगंज पोलीस स्टेशनमध्ये आली. जिथे मुलांनी पोलिसांना आईला शोधण्याची विनंती केली. महिलेच्या मोठ्या मुलाचं वय १३ वर्षे तर सर्वात लहान मुलीचे वय २ वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे.
पत्नी पळून गेल्याचं समजताच पतीही गावी परतला. याप्रकरणी त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पतीने गावातीलच आणखी एका महिलेवर पत्नीला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. पती नोकरीनिमित्त बाहेरगावी गेला होता. याचदरम्यान पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले.