दिल्लीतील सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट; वाहनांच्या फुटल्या काचा

bomblast-at-delhi-school

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार परिसरात रविवारी सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत सीआरपीएफ शाळेची भिंत, जवळपासची दुकाने आणि काही गाड्यांचं नुकसान झालं असून कोणीतीही जिवित हानी झाली नाही. पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम सुरू केली असून, नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पोलिसांनी सांगितलं की, स्फोटानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये दाट धूर दिसत आहे. बॉम्ब निकामी पथक, फॉरेन्सिक टीम, गुन्हे शाखा आणि अग्निशमन दलाचे अधिकारी तपासासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.

स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तरी या स्फोटामुळं लोकांनी सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनेनंतर प्रशांत विहार परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्फोटाचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास करण्यात येत आहे. रोहिणी जिल्ह्याचे डीसीपी अमित गोयल यांनी सांगितलं की, “स्फोटाचं कारण शोधण्यासाठी तज्ञांना पाचारण करण्यात आलं आहे. हा स्फोट कोणत्या प्रकारचा होता हे सध्या स्पष्ट झालं नाही. तज्ज्ञांचे पथक या घटनेचा सविस्तर तपास करत असून लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल”. तसेच स्फोटाचा आवाज ज्या ठिकाणी ऐकू आला त्या ठिकाणी एनडीआरएफची टीमही पोहोचली आहे.

दुसरीकडं, दिल्ली पोलिसांचे पीआरओ संजय त्यागी म्हणाले की, “आज सकाळी प्रशांत विहार पोलिस स्टेशनला सीआरपीएफ शाळेजवळ भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. शाळेच्या आवारातील खिडकीच्या काचा आणि आरसे तुटले आहेत”. वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेचे तज्ज्ञ तपास करत आहेत. तर तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here