लखनौ (वृत्तसंस्था) : घरातील सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात ५ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून घटनास्थवर ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक दबल्या गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना सिकंदराबाद इथल्या गुलावठी रोडवर असलेल्या आशापुरी कॉलनीमध्ये सोमवारी सायंकाळी घडली. सिलिंडर स्फोट झाल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सोमवारी सायंकाळी उशिरा आशापुरी कॉलनीतील एका घरात मोठा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. रात्री आठच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे संपूर्ण घर कोसळलं. घरातील अनेक नागरिक या अपघातात गाडले गेले. मोठा आवाज झाल्यानं सेजारील नागरिक घटनास्थळी धावले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम करण्यात आलं. घटनास्थळावरुन महिला आणि लहान मुलांसह ५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या ठिकाणच्या ढिगाऱ्याखाली अजून काही नागरिक दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनास्थळावर दबलेल्या नागरिकांच्या बचावासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. बचाव आणि मदत कार्याला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. घटनास्थळावर अद्यापही बचावकार्य सुरू आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. त्याचा फटका आजूबाजूच्या इमारतींना बसल्याचंही बोललं जात आहे. प्रशासकीय अधिकारी नुकसानीचा आढावा घेत आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्या नागरिकांचा जीव वाचवता यावा, यासाठी ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे.