दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे झालेल्या प्रदूषणाने शुक्रवारी सकाळी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) धोक्याच्या पातळीवर, ४००च्या उंबरठ्यावर पोहोचला. दिल्लीत दिवसभर धुक्याचा पडदा राहिल्याने नागरिकांना श्वास घेणेही अवघड बनले.
उत्तर भारतात दोन दिवस साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्या पहिल्या रात्री, गुरुवारी दिल्लीतील अनेक भागांत फटाक्यांची आतषबाजी झाली. दिल्लीत फटाक्यांवर कायदेशीर बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन झाले. त्यानंतर शुक्रवारी दिवसभर ‘एक्यूआय’ ‘अत्यंत खराब’ पातळीवर घसरला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांसारख्या प्रदूषण निरीक्षण संस्थांनुसार, गेल्या २४ तासांतही दिल्लीत ‘एक्यूआय’ ‘अत्यंत खराब’ पातळीवरच आहे.
दिवाळीच्या दिवशी रात्रीच्या प्रदूषणाची पातळी चिंताजनकरित्या वाढली. पीएम २.५ ते पीएम ५ या विषारी वायुकणांचे प्रमाण मर्यादेच्या किमान ३० पटींनी वाढले होते. मानवी आरोग्यासाठी हे घातक आहे, असे ‘डीपीसीसी’चे माजी अतिरिक्त संचालक मोहन पी. जॉर्ज यांनी सांगितले. दिल्लीचा ‘एक्यूआय’ बुधवारी ३०७च्या पुढे नोंदवला गेला. यंदाची ही दिवाळी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक प्रदूषित ठरल्याचे आकडेवारी सांगते.