लोकनाट्यातील वगसम्राट हरपला; तमाशा सादर करत असतांनाच नामदेवरावांचा हृदयविकाराने मृत्यू

namdeorao-anjalekar

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) : खान्देशातील प्रसिद्ध भीमा-नामा अंजाळेकर लोकनाट्य तमाशा मंडळातील तमाशा कलावंत वगसम्राट नामदेव आप्पा अभिमन बोरसे (वय ५५) यांचे धुळे येथे तमाशा सादर करत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता ऐन लक्ष्मीपूजनच्या दिवशी घडली आहे. त्यामुळे खान्देशातील कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

 

नामदेव अभिमान बोरसे (वय ५५, रा. अंजाळे ता. यावल) यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. खांदेशातील प्रसिद्ध भीमा-नामा अंजाळेकर लोकनाट्य तमाशा मंडळ हे गेल्या ४० वर्षापासून खांदेशामध्ये आपला नावलौकिक मिळवून आहे. यातील भीमा म्हणजेच भीमराव बोरसे हे नामदेवराव बोरसे यांचे सख्खे भाऊ. त्यांचे ७ वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर नामदेवराव बोरसे हे स्वतः तमाशा सादर करत असत. शुक्रवारी दि. १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांचा धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील यात्रोत्सवात रात्री ८ वाजता तमाशाचा कार्यक्रम होता.

 

यात्रेमध्ये तमाशा ऐन रंगात आला असतानाच नामदेवराव बोरसे यांना त्रास होऊ लागला. अचानक छाती दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह खादेशातील लोककला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. खान्देशातील लोककला क्षेत्रातील वगसम्राट हरपल्याची प्रतिक्रिया लोकनाट्य कलावंतांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here