मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी लग्नाच्या २९ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांच्या वकिलांनी १९ नोव्हेंबर २०२४ रोजी निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.
घटस्फोटाची प्रकरणं हाताळणाऱ्या प्रसिद्ध वकील वंदना शहा यांनी या निवेदनात म्हटलं आहे की, या दोघांच्या नातेसंबंधातील ‘भावनिक तणावामुळे’ त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, “लग्नाच्या अनेक वर्षांनंतर सायरा आणि त्यांचे पती ए. आर. रहमान यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. नातेसंबंधातील भावनिक तणावामुळे या दोघांनी हा निर्णय घेतला आहे.”
वंदना शहा म्हणाल्या की, “या दोघांचं एकमेकांवर एवढं प्रेम असूनही त्यांचे संबंध ताणलेले होते. या नात्यातल्या अडचणी एवढ्या वाढल्या होत्या की, हा दुरावा कमी करणं अशक्य झालं होतं. दोघांपैकी एकालाही हे अंतर कमी करणं शक्य नव्हतं.” ए. आर. रहमान यांनी मंगळवारी (१९ नोव्हेंबर) मध्यरात्री त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करूनही याबाबतची माहिती दिली आहे.