भोपाळ (मध्यप्रदेश) : चालकाचे नियंत्रण सुटल्यानं डिव्हायडरला कार धडकून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना मध्य प्रदेशातील मैहर इथं घडली. सुखविधान सिंह, दामोदर सिंह, अरविंद सिंह आणि शिवराज सिंह असं मृत झालेल्या वऱ्हाड्यांची नावं आहेत. कार अपघातात ठार झालेले सर्वजण हे देवेंद्रनगर पन्ना जिल्ह्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घसडू नदीजवळ चालकाला डुलकी लागल्यानं हा अपघात झाल्याचंही यावेळी सूत्रांनी सांगितलं आहे. कारमधील सगळेजण हे लग्न समारंभावरुन परत येत असताना ही अपघात घडला आहे.
सुखविधान सिंह, दामोदर सिंह, अरविंद सिंह आणि शिवराज सिंह हे मध्य प्रदेशातील कटनी इथं लग्न समारंभाला गेले होते. यावेळी परत येताना राष्ट्रीय महामार्ग ३० जवळील घसडू नदीजवळ चालकाला डुलकी लागली. त्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारचा अपघात झाल्याचं कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी नागरिकांनी बचावकार्य केलं, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.
मैहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “कटनीवरुन मैहरच्या दिशेनं येताना कार क्रमांक एमपी ३५ सीए ५६३१ कारच्या चालकाला घसडू नदीजवळ डुलकी लागली. त्यामुळे चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार अगोदर डिव्हायडरला धडकली. त्यानंतर ती रस्त्यावरील खड्ड्यात पडल्यानं कारमधील ४ जणांचा मृत्यू झाला.” या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. नागरिकांना अपघाताची माहिती दिल्यानंतर मैहर पोलीस स्टेशनच्या जवानांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढले. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी मैहर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.