पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : प्रेयसी व योगा टिचरने खोट्या बलात्काराच्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिल्याने चाकणमधील तरुणाने लोणावळ्यातील राजमाची दरीत उडी मारुन आत्महत्या केली होती.याप्रकरणी चाकण पोलिसांनी प्रेयसी व योगा टिचरवर गुन्हा दाखल केला आहे.
सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय २७, रा. श्रीरामनगर, चाकण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ श्रीकांत रामदयाल प्रजापती (वय २५, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी योगा टिचर बापू सोनवणे व प्रेयसीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी घडली होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सूर्यकांतला आपल्या प्रेयसीचे दुसर्या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याचा संशय होता. त्याबाबत त्याने विचारणा केल्यावर प्रेयसी व योगा टिचरने त्याला खोट्या बलात्काराच्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. टेलिग्राम अॅप, वॉटसअॅप, गुगल पे वर घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करुन अपमान केला. या त्रासाला कंटाळून त्याने ९ ऑक्टोबर रोजी चाकण येथील घर सोडले. त्याचे नातेवाईक सूर्यकांत याचा शोध घेत होते. त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी त्याने दोन सेकंदाचा व्हिडिओ काढून आपल्या नातेवाईकांना पाठविला होता.
सूर्यकांत याने आत्महत्या करण्यापूर्वी अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ तयार करुन तो आपल्या कुटुंबियांच्या मोबाईलवर पाठवला होता. या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बॅकग्राऊंडवरुन सूर्यकांत याच्या आत्महत्येचा शोध लागला. या व्हिडिओवरुन लोणावळा येथील शिवदुर्गच्या पथकाने राजमाची दरीत ३७० फुट खोल दरीत शोध घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला होता. त्यानंतर आता त्याच्या भावाने फिर्याद दिल्यानंतर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत.