मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : आयआयटी मुंबईतील एका विद्यार्थ्याची डिजिटल अरेस्टमध्ये ७ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. विद्यार्थ्याला फसवण्यासाठी भामट्यांनी ट्रायच्या नावाखाली बनावट व्हॉट्सअॅप कॉल करून त्याच्यावर आरोप लावले आणि मोठी रक्कम उकळली. या प्रकारामुळे सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत जागरूक राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
विद्यार्थ्याला एका अज्ञात व्हॉट्सअॅप नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला TRAI चा अधिकृत अधिकारी असल्याचे भासवले. या व्यक्तीने विद्यार्थ्याला सांगितले की, त्याच्यावर डिजिटल अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आले आहे. हा वॉरंट त्याच्या मोबाईल नंबरशी संबंधित असल्याचे सांगून त्याला मोठ्या कायदेशीर अडचणीत पडण्याची भीती दाखवण्यात आली. फसवणूक करणाऱ्यांनी विद्यार्थ्याला सांगितले की, हा वॉरंट रद्द करण्यासाठी लगेच रक्कम भरली पाहिजे, अन्यथा त्याला तुरुंगवास होईल. विद्यार्थ्याला खोट्या कायदेशीर गोष्टींच्या जाळ्यात अडकवून घाबरवले गेले. त्यासाठी त्यांनी अत्यंत हुशारीने अधिकृत भाषा आणि गंभीर स्वर वापरून त्याच्यावर दबाव आणला.
भामट्यांनी विद्यार्थ्याला विविध खात्यांमध्ये ८ लाख रुपयांचे व्यवहार करण्यास भाग पाडले. घाबरलेल्या विद्यार्थ्याने त्यांच्या सूचनांनुसार पैसे ट्रान्सफर केले. पैसे पाठवल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच विद्यार्थ्याने सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे डिजिटल फसवणुकीच्या प्रकारांविरोधात सावधगिरी राखणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.