अंबाला (हरियाणा) : लखीमपूर खिरी येथील घटनेची हरयाणात पुनरावृत्ती झाली असून जिह्यातील नारायणगडमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजप खासदार नायब सैनी यांच्या ताफ्यातील गाडीने उडवले. या घटनेमुळे भाजपविरुद्ध सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
अंबाला जिह्यातील नारायणगडमध्ये गुरुवारी एका कार्यक्रमासाठी क्रीडामंत्री संदीप सिंह आणि कुरुक्षेत्रचे भाजप खासदार नायब सैनी पोहोचले होते. शेतकऱ्यांना ही माहिती मिळताच कार्यक्रम स्थळाबाहेर त्यांनी आंदोलन सुरू केले. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरू होते.
कार्यक्रम संपल्यानंतर खासदार सैनी यांच्या गाडय़ांचा ताफा निघाला. एका गाडीने आंदोलक शेतकऱ्याला उडवले. त्यात एक शेतकरी जखमी झाला आहे. भाजप खासदाराच्या गाडीने शेतकऱ्याला उडवल्याचे वृत्त समजताच सर्वत्र खळबळ उडाली आहे.






