लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; ८ जणांचा मृत्यू

UP-Accident

कौशाम्बी (उत्तर प्रदेश )- कौशाम्बी जिल्ह्यातील कडाधाम गावात वाळूने भरलेला ट्रक आणि स्कॉर्पियोमध्ये भीषण अपघात झाला आहे. यावेळी ट्रकमधील वाळू कारवर मोठ्या प्रमाणात पडल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

उत्तर प्रदेशातील कडाधाम गाावातील देवीगंज बाजार परिसरात असणाऱ्या गेस्टहाऊसमध्ये शहजादपूर येथील पंकज नावाच्या व्यक्तीचे लग्न होते. लग्न झाल्यानंतर वऱ्हाडी मंडळी स्कॉर्पियो कारने आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. मात्र, कार चालक मार्ग चुकला त्यामुळे योग्य मार्ग विचारण्यासाठी २ महिला गाडीतून खाली उतरल्या. समोरुन वाळूने भरलेला ट्रक वेगाने येत होता. अचानक त्या ट्रकचे टायर फुटले आणि नियंत्रण सुटलेला ट्रक स्कॉर्पियोवर आदळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या मदतीने ट्रकला बाजूला केले आणि वाळू खाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र, या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये सहा महिला एक १२ वर्षाचा मुलगा आणि कारचालकाचा सामावेश आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ट्रकमध्ये भरलेल्या वाळूचा अतिभार झाला आणि त्यामुळे टायर फूटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

प्रकाशनीय गुप्ता-पत्नी बसंत लाल, राहणार (राजरूपपुर प्रयागराज), प्रकाशनीय यांची मुलगी नेहा, पूनम देवी राहणार (शहजादपुर कौशाम्बी), पूनम यांची मुलगी मुस्कान, शशी गुप्ता-पत्नी रमेश गुप्ता, राहणार (आल्लापुर प्रयागराज) शशी यांचा आठ वर्षाचा मुलगा ओम, सोमा तिवारी, मुलगी इंद्र प्रकाश तिवारी, राहणार (शहजादपुर कौशाम्बी) आणि चालक हे या अपघातात मृत झाले आहेत.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सोबतच आर्थिक मदत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here