चक्रधरपूर (झारखंड) – नक्षलवाद्यांविरोधात चालवण्यात येणाऱया ‘ऑपरेशन प्रहार’चा विरोध करताना झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे विभागात रविवारी रात्री नक्षलवाद्यांकडून रेल्व रुळावर भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणण्यात आला. यामुळे हावडा-मुंबई मुख्य रेल्वेमार्ग ठप्प झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चक्रधरपूर रेल्वे विभागाच्या लोटापहाडजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या मदतीने रेल्वे रुळावरच स्फोट घडवून आणला. रविवारी रात्री 2.15 मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच, चक्रधरपूर रेल्वे विभागाकडून संबंधित रेल्वेची वाहतूक रोखली. भूसुरुंग स्पह्टामुळे रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हावडा – मुंबई मुख्य रेल्वेमार्गावर रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. चक्रधरपूर रेल्वे विभागाच्या वेगवेगळ्या स्टेशन्सवर पॅसेंजर ट्रेन्स अडकून पडल्या आहेत.
नक्षलवाद्यांकडून रेल्वमार्ग स्फोटाने उडवण्यात आल्याची माहिती मिळताच, जिल्हा पोलीस, आरपीएफसोबतच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेची अधिक चौकशी सुरू आहे. लवकरच रेल्वेमार्ग दुरुस्त करून थांबलेल्या रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱयांनी सांगितले.






