बुलंद शहर (उत्तर प्रदेश) – आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे आणि इंटरनेटही माफक दरात उपलब्ध होत असल्याने अनेकजण त्याचा चांगला उपयोग करण्याऐवजी चुकीची माहिती, फसवणूक होणाऱ्या बाबींना बळी पडल्याचे प्रकार समोर आले आहेत. अनेकजण कामे सोडून सोशल मीडियावर तासन् तास पडून असल्याचे दिसते. असाच प्रकार उत्तर प्रदेशातील बुलंद शहर येथून समोर आला आहे.
फेसबुकवरून प्रेम जमलेल्या जोडप्यातील पतीने पत्नीला व्हाट्सअपवरून तीन तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. शिकारपूर पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली, सहा वर्षांपूर्वी फेसबुकवरून एका मुलीशी प्रेमसंबंध जन्मल्यानंतर संबंधित युवकाने तिच्याशी निकाह केला. मात्र, या मुलीचे आयुष्य आता उद्ध्वस्त झाले आहे. कारण त्यानं तिला तिहेरी तलाक दिला आहे.
या जोडप्याला दोन मुले असून संबंधित महिलेने पतीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. ही महिला मूळची छत्तीसगडची असून तिच्या पतीने मुलांचाही ताबा तिच्याकडून काढून घेतला आहे. तसेच या महिलेने वारंवार शारीरिक आणि मानसिक हिंसा झाल्याचाही आरोप केला आहे. सध्या ही महिला न्यायासाठी एसएसपी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. तिने शिकारपूर पोलीस ठाण्यातही दाद मागण्याचा प्रयत्न केला, मात्र विविध कायदेशीर बाबी सांगत तिला महिला सल्ला केंद्रात जाण्यास सांगण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. सध्या ही महिला पोलीस ठाणे न्यायालय अशा सगळ्या ठिकाणी फिरून-फिरून थकली असल्याचे तिने सांगितले. मात्र, न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत निर्धारही तिने व्यक्त केला आहे. मात्र, आतापर्यंत या महिलेला कोणीही मदत केलेली नाही. निराश होऊन ही महिला अखेर आत्महत्या करण्याचा विचार करत आहे.






