साडेसात लाखांची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले

लाचखोर पोलीस निरीक्षकाच्या निवृत्तीला बाकी होते अवघे चार महिने

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करतो म्हणून आरोपीकडून तब्बल साडेसात लाखाची लाच घेताना सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संपत नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरूम चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपींना मदत करून गुन्ह्यातून सही सलामत सुटण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याच्याकरवी १० लाख रूपयाची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती साडेसात लाख रूपये देण्याचे ठरले.

त्यावरून तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रारीची खातरजमा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुना पुना नाका छत्रपती संभाजी महाराज चौकात सापळा लावला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याने पैसे स्विकारत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

दरम्यान, दोन्ही अधिकाऱ्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक संजीव जाधव यांनी दिली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत पवार हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी वादग्रस्त ठरले आहेत. पवार यांनी पोलीस खात्यात जवळपास ३२ वर्षे सेवा बजावली आहे. सोलापुरात रुजू झाल्यांनातर अडीच वर्षांपूर्वी त्यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. अवघ्या चार महिन्यात त्यांची निवृत्ती देखील होती. मात्र निवृत्तीपूर्वीच लाचखोरीच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here