बेंगळुरू (कर्नाटक) : येथील बयादरहल्ली भागात एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले आहेत. यातील चार जणांनी गळफास घेतला आहे , तर नऊ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह पलंगावर पडलेले आढळले. प्राथमिक तपासामध्ये हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. एक अडीच वर्षांची मुलगी पाच मृतदेहांसह घरात पाच दिवसांपासून राहत होती, ती जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली. पोलिसांनी सांगितले आहे की लोक कसे मरण पावले, हे पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच कळेल.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, सिंचना – वय ३४ वर्षे,भारती – वय ५१ वर्षे,सिंधुराणी – वय ३१ वर्षे,मधुसागर – वय २५ वर्षे आणि ९ महिन्याचे बाळ असे मृत्युमुखी पडले असून, अडीच वर्षांची ती मुलगी त्याच खोलीत सापडली जिथे मधुसागरने गळफास घेतले.सध्या मुलीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला उपचार आणि समुपदेशनाची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम) म्हणाले की, आम्हाला घरातून कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. घरातील वडीलधारी शंकर यांना धक्का बसला आहे. शंकरने सांगितले आहे की त्यांच्या मुली त्यांच्या पतींशी भांडण करून घरी आल्या. या समस्येवर तोडगा काढण्याऐवजी आणि त्यांना त्यांच्या पतींकडे परत पाठवण्याऐवजी, त्यांची पत्नी भारती यांनी त्यांना इथेच राहण्यास प्रोत्साहित केले.
पोलिसांनी सांगितले की, शेजाऱ्यांनी त्यांना घरात भांडण झाल्याची माहिती दिली,नंतर मधुसागर तडकाफडकीने घरातून रागावून बाहेर निघून गेला. या कुटुंबाने रविवारीच आत्महत्या केली.






