धरणगावमध्ये क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक; २० जूनला मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्‌घाटन

धरणगाव

धरणगाव (उपसंपादक प्रा. पी एम पाटील) : येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. हा प्रकल्प भावी पिढ्यांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला.

या पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजुभाऊ चौधरी हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
खाज्याजी नाईक यांच्या नेतृत्वाखालील आदिवासींच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, त्यांच्या त्यागमय संघर्षाची उजळणी करणारे हे स्मारक समाजप्रबोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. या स्मारक प्रकल्पाचे भव्य उद्घाटन दिनांक २० जून २०२५ रोजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.
गिरीश महाजन यांनी सांगितले की, “हा प्रकल्प केवळ ऐतिहासिक स्मृती जपणारा नाही, तर सामाजिक उभारणीचे प्रतीक म्हणून उभा राहील. शासनाच्या वतीने यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.” या प्रसंगी अनेक स्थानिक पदाधिकारी, आदिवासी समाजाचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here