अहमदाबाद (गुजरात) (वृत्तसंस्था) । येथील एका खासगी शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेले किरकोळ भांडण इतके विकोपाला गेले की नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याची चाकूने वार करत हत्या केली. जिल्ह्यातील खोखरा भागात मंगळवारी ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेची तोडफोड केली. त्यामुळे तणावाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी गुजरातच्या खोखरामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यावर नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्ला करणारा आणि हल्ल्यात मृत्यू झालेले विद्यार्थी वेगवेगळ्या समाजातील आहेत. या घटनेनंतर अहमदाबादमध्ये तणावाचे वातावरण आहे. बुधवारी संतप्त झालेल्या मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी शाळेची तोडफोड केली. सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण आहे. आरोपी विद्यार्थ्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवड्याभरापूर्वी मृत्यू झालेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याच्या चुलत भावाचे नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी भांडण झाले होते. मंगळवारी पीडित विद्यार्थी त्याच्याशी बोलण्यासाठी गेला तेव्हा त्यांच्यात भांडण झाले. या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर या वादात १५ वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतले आहे आणि घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या मुलांचे जबाब घेतले आहेत. आरोपी विद्यार्थी दुसऱ्या समुदायाचा असल्याने या घटनेने जातीय तणावाचे रूप घेतले. शाळेत झालेल्या हत्येसारख्या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांव्यतिरिक्त, हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी हिंसक निदर्शने सुरू केली.
या घटनेनंतर शाळेची तोडफोड करण्यात आली. कुटुंबीयांनी शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. घोषणाबाजी दरम्यान जमाव आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. अनेक कुटुंबीयांनी आरोप केला की, काही विद्यार्थी शाळेत शस्त्रे आणि ड्रग्जसारख्या वस्तू आणत असतात. त्यांच्यावर शाळा प्रशासनाने वेळीच कारवाई करणे गरजेचे असल्याची भूमिका मांडली जात आहे.







