मुंबई (जॉनी वाझ) – अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले आहे. कंगणाने धमकी दिल्याचा आरोप केला आहे. मुंबईत परत न येण्याची धमकी राऊत यांनी दिल्याचे कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ट्विटमध्ये तिने लिहिले आहे की, ‘शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आहे आणि म्हटले आहे की, मुंबईला परतून येऊ नकोस. मुंबईतील गल्ल्यांमधून स्वातंत्र्याच्या घोषणांनंतर आता उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटू लागली आहे?’ या ट्विटनंतर अभिनेता रितेश देशमुखने तीनच शब्दात मुंबई हिंदुस्तान है असे ट्विट करत कंगणाच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. शिवसेनेचे नेत संजय राऊत यांनी ‘सामना’तून कंगनावर निशाणा साधत तिने मुंबईत परतून न येण्याविषयी म्हटले होते. कंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत हिमाचल प्रदेश पोलिस वा केंद्र सरकारकडून सुरक्षा घ्यावी, असे म्हटले होते. त्यावेळी राऊत यांनी कंगनावर निशाणा साधला होता.







