नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असून कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलाचा स्वीकार करुन त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम 15 सप्टेंबर 2020 पासून राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यभरात ही मोहीम राबविली जाणार असून नंदुरबार जिल्ह्यात राबविली जाणारी मोहीम देखील या राज्यव्यापी मोहिमेचा एक भाग आहे. जिल्ह्यातील नागरिकांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेद्वारे प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करण्यात येणार आहे. कोविड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्य शिक्षण साधणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वंयसेवक हे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांचा ताप आणि प्राणवायू पातळी तपासणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, कोविड-19 चे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे यासारख्या बाबी राबविल्या जाणार आहेत. मधुमेह, ह्दयविकार, मूत्रपिंड (किडनी) विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचाही या मोहिमेत समावेश असणार आहे.
मोहिमेच्या एकूण कालावधी दरम्यान साधारणपणे दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटूंबाला भेटणार आहेत. कुटूंब म्हणून आवश्यक असलेली काळजी घरातील सर्व सदस्यांनी घ्यावी, कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेली पथ्य पाळताना अनावधानाने चूक होत असल्यास ती एकमेकांच्या निदर्शनास आणून द्यावीत हा यातील महत्वाचा भाग आहे.
कोविड नियंत्रणासाठी वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत परिणामकारक अशी अत्यंत आवश्यक त्रिसूत्री पुढील प्रमाणे आहे. नागरिकांनी आपापसात किमान 2 मीटरचे सुरक्षित अंतर ठेवणे, मुखपट्टी , मुखावरण अर्थात ‘फेस मास्क’ चा कटाक्षाने नियमितपणे व योग्य वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे तसेच निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर ) चा योग्यरित्या वापर करणे. या अत्यंत महत्वाच्या त्रिसूत्री प्रत्येकाने पाळणे गरजेचे आहे..
जोवर कोविड विषाणूवर प्रभावी लस सापडत नाही, तोपर्यंत नागरिकांनी यासर्व बाबींचे पालन करुन या साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.







