प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला कंटेनरची धडक; १५ प्रवासी जखमी

बसला कंटेनरची धडक

नवापूर (प्रतिनिधी) । तालुक्यातील कोंडाईबारी घाटात महामार्गावरील पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या एसटी बसला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली.यावेळेस या बसमधून १५ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. या भीषण धडकेमुळे बस समोर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली आणि दोन अवजड वाहनांच्या मध्ये अक्षरशः चिरडली गेली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

हा अपघात इतका भयानक होता की, समोरच्या ट्रकचा १० ते १२ फुटांचा लोखंडी रॉड अँगल.बसचे लोखंडी पत्रे फाडून थेट केबिनमध्ये घुसला. यामुळे बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला असून चालक महेंद्र लांजा गावित यांचा पाय केबिनमध्ये अडकून पडला होता. स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून चालकाला सुखरूप बाहेर काढले.
अपघाताची माहिती मिळताच जामनपाडा सरपंच प्रियंका गावित यांचे बंधू मनोहर गावित यांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी तातडीने आपल्या खासगी वाहनातून गंभीर जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर उपचार मिळू शकले.
घटनास्थळी परिवहन विभागाचे निरीक्षक मुकेश देवरे दाखल झाले असून ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णत ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here