मुंबई (गणेश तळेकर) – तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेल्या कंगना रणौतच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचीही आता मोठी चर्चा आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये निर्माता सोहेल मकलाई यांनी कंगनाची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याची पूर्वतयारी अजूनही सुरूच आहे. या चित्रपटासाठी लोकेशन्स शोधले जात होते. आता मध्य प्रदेशातील एका कोळशाच्या खाणीचे हवे तसे लोकेशन निर्मात्यांना मिळाले असून लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.
‘धाकड’ चित्रपटाचे दिग्दर्शक रजनीश घई हे आहेत. या चित्रपटात कंगनाने शीर्षकाप्रमाणेच धाडसी असलेल्या तरुणीची भूमिका साकारली आहे. दुर्बल आणि वंचित लोकांच्या हक्कासाठी ही तरुणी संघर्ष करीत असल्याचे कथानक चित्रपटात आहे. या भूमिकेत ती हाणामारी आणि वेगवेगळे स्टंटस्ही करीत असताना दिसून येईल.
कंगनाने आतापर्यंत अनेक नायिकाप्रधान चित्रपट केले आहेत आणि या चित्रपटांचे प्रेक्षक व समीक्षकांनीही कौतुक केले आहे. सध्या ती ‘अभिनेत्री ते यशस्वी राजकीय महिला’ असा प्रवास केलेल्या तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित ‘थलायवी’ या चित्रपटात जयललिता यांची भूमिका साकारत आहे. यापूर्वी तिचा महिला कबड्डीपटूचा संघर्ष दाखवणारा ‘पंगा’ हा चित्रपट येऊन गेला आहे. सध्या कंगना हिमाचल प्रदेशातील आपल्या घरी असून तिथे ती फिटनेसवर मेहनत घेत आहे. हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील भांबला (आता सुरजपूर) या छोट्याशा गावातून तिचा जीवनप्रवास सुरू झाला होता.







