बालगंधर्व नाट्यगृहाच्या बंदिस्त कामासाठी अडीच कोटी मंजूर; वर्षभरात दिवस-रात्र नाट्यप्रयोग रंगणार – राजूमामा भोळे

राज्य नाट्य

जळगाव केंद्रावरील ६५ व्या राज्य नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा; ‘स्वप्न न पडणारा माणूस’ नाटकाने उघडला स्पर्धेचा पडदा

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | स्थानिक कलाकारांना अत्यंत माफक दरात आणि हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने येथील बालगंधर्व खुल्या नाट्यगृहाचे बंदिस्त नाट्यगृहात रूपांतर करण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या सहा ते आठ महिन्यांत किंवा जास्तीत जास्त वर्षभरात हे काम पूर्ण होऊन येथे दिवस-रात्र नाट्यप्रयोग रंगतील, असा विश्वास आमदार राजूमामा भोळे यांनी व्यक्त केला. ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या जळगाव केंद्राचे उद्घाटन आ. भोळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

 

राज्य नाट्य स्पर्धेसारख्या उपक्रमांमुळे जळगावच्या कलाकारांना आपले गुण सादर करण्याची मोठी संधी मिळते आणि त्यातून जिल्ह्याचे नाव राज्यभरात उंचावते, असे आ. भोळे यांनी सांगितले. कार्यक्रमात संख्येने गर्दी असण्यापेक्षा कलेची जाण असणारे दर्दी रसिक असणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी नाट्यरसिकांचे कौतुक करत त्यांनी सर्व स्पर्धक संघांना शुभेच्छा दिल्या.

शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन

केवळ कलाकार किंवा रसिक म्हणून नव्हे, तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपले समाजाप्रती काही देणे लागते, याची जाणीव आ. भोळे यांनी करून दिली. “सीमेवर सैनिक लढतो म्हणून आपण शांत झोपू शकतो आणि शेतात शेतकरी राबतो म्हणून आपल्याला अन्न मिळते. यंदा पाऊस कमी झाल्याने आपण संभाव्य दुष्काळाकडे वाटचाल करत आहोत. अशा कठीण प्रसंगी प्रत्येकाने तन-मन-धनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि भविष्यातील संकट टाळण्यासाठी आत्तापासूनच पाण्याची काटकसर करावी,” असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बालगंधर्व खुले नाट्यगृहासाठी अडीच कोटींचा निधी

पुढे बोलताना आमदार भोळे यांनी कलाकारांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “जळगावच्या कलाकारांमध्ये मोठी गुणवत्ता आहे; परंतु मेट्रो शहरांप्रमाणे संधी किंवा प्रयोगासाठी योग्य जागा उपलब्ध होत नसल्याची खंत अनेकदा व्यक्त केली जाते. वाढत्या खर्चामुळे अनेक छोटे-मोठे प्रयोग रखडतात. ही अडचण दूर करण्यासाठी बालगंधर्व नाट्यगृह बंदिस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय पातळीवर याची प्रक्रिया सुरू असून, येत्या वर्षभरात हे नाट्यगृह पूर्ण क्षमतेने कलाकारांसाठी खुले होणार आहे.”

राजकीय नाटकात चुकलो तर थेट ‘आऊट’!

भाषणाच्या शेवटी आ. भोळे यांनी रंगभूमी आणि राजकारण यांची मिश्किल तुलना करत सभागृहात हशा पिकवला. “मी जरी रंगभूमीवर काम करत नसलो, तरी आमचे राजकीय नाटक रोजच सुरू असते. मात्र, तुमच्या नाटकात एखादी चूक झाली तर ती सुधारण्याची किंवा पुन्हा भूमिका करण्याची संधी मिळते; आमच्या राजकारणात मात्र एकदा चूक झाली की थेट ‘आऊट’ व्हावे लागते,” अशी कोपरखळी त्यांनी मारताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.राज्य नाट्य

‘स्वप्न न पडणारा माणूस’चा दमदार प्रयोग

उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी अनिल कोष्टी लिखित व दिग्दर्शित ‘स्वप्न न पडणारा माणूस’ या नाटकाच्या दमदार सादरीकरणाने स्पर्धेचा पडदा उघडला. आपल्याकडे जी गोष्ट नाही, त्याबद्दल माणूस सतत अस्वस्थ असतो आणि ती मिळवण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न करतो; मात्र या नादात हाती असलेले सुखही तो गमावून बसतो, या मानवी मानसिकतेवर प्रकाश टाकणाऱ्या या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

प्रत्येक माणसाला स्वप्ने पडतात, मात्र आपल्याला स्वप्नच पडत नसल्यामुळे मनात निर्माण झालेली प्रचंड अस्वस्थता आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी स्वतःच्या मनात नवी स्वप्ने रंगवून ती प्रत्यक्षात आणण्याची नायकाची धडपड, असा मानवी मनाचे सूक्ष्म पैलू उलगडणारा अत्यंत प्रभावी आशय ‘स्वप्न न पडणारा माणूस’ या नाटकातून सादर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या (६५ व्या) उद्घाटनप्रसंगी भुसावळच्या उत्कर्ष कलाविष्कार संस्थेने सादर केलेल्या या दोन अंकी नाटकाच्या प्रयोगाने उत्तरोत्तर रंगत आणत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

प्रशांत बागड यांच्या मूळ कथेवर आधारित आणि अनिल कोष्टी लिखित या नाटकाच्या सशक्त रंगावृत्तीने व सादरीकरणाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवले. नाटकातील ‘स्वप्न न पडणारा माणूस’ ही मध्यवर्ती आणि आव्हानात्मक भूमिका स्वतः लेखक अनिल कोष्टी यांनी अत्यंत संवेदनशीलतेने साकारली. त्यांच्यासह इतर कलाकारांनीही आपल्या भूमिकांना चोख न्याय दिला. यात प्रबोध भावे (सहकारी, डॉक्टर, सद्गुरू), सुशील पाटील (जॉगर-१, मावसभाऊ), उमेश गोरधे (जॉगर-२, रद्दीवाला, ग्राहक, गूढदर्शनी माणूस), वैष्णवी बाविस्कर (स्वप्नातील बाई, काउन्सलर, जेमिनी), रिया कोल्हे (मिसेस विसापूरकर, गूढदर्शनी बाई), कुंदन तावडे (म्हातारा पेशंट), अक्षय चैत्रत (सिक्युरिटी गार्ड), सुजय जगताप (इस्त्रीवाला), स्वरा बेलोकर (पेशंट बाई) तसेच निषिता ठाकूर, रोहित लोळके, अनिकेत सूर्यवंशी आणि रूपेश शेळके यांनी ‘ग्रीक कोरस’ची धुरा अत्यंत प्रभावीपणे सांभाळत नाटकाचा वेग आणि आशय अधिक गडद केला.

मान्यवरांची उपस्थिती व नाट्यरसिकांना आवाहन

या उद्घाटन सोहळ्याला आ. सुरेश भोळे यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक उल्हास देशपांडे, सरिता अनिरुद्ध, विजय कोलवणकर, केसीई सोसायटीचे शशिकांत वडोदकर, प्रसाद देसाई, शाहीर विनोद ढगे, प्रा. शमा सराफ, अभिनेते अनिल मोरे, विशाखा सपकाळे आणि अ.भा.मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य गीतांजली ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे समन्वयक प्रा. संदीप तायडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख यांनी सांभाळले, तर आभार सहसमन्वयक नितीन तायडे यांनी मानले.

दरम्यान, ही राज्य नाट्य स्पर्धा मू. जे. महाविद्यालयाच्या महाकवी कालिदास सभागृहात पार पडत असून, दररोज सायंकाळी ७ वाजता नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. जळगावकरांनी व नाट्यरसिकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here