मुंबई (संपादक सुनिल पाटील) | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याला एक धमकीचा ऑडिओ मेसेज मिळाला असून, त्यात स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने अभिनेत्याकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या ऑडिओ मेसेजची अतिशय गांभीर्याने दखल घेण्यात आली असून पुढील तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आयुष्मान खुराला पाठवण्यात आलेल्या या ऑडिओ मेसेजमध्ये अज्ञात व्यक्तीने स्वतःची ओळख लॉरेन्स टोळीचा सदस्य म्हणून करून दिली आहे. मात्र, या व्यक्तीचा लॉरेन्स गँगशी प्रत्यक्ष संबंध आहे की केवळ घबराट पसरवण्यासाठी आणि खंडणी वसूल करण्यासाठी गँगचे नाव वापरले गेले आहे, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांनी या ऑडिओ क्लिपची सखोल तपासणी सुरू केली असून, ऑडिओमधील आवाजाची तुलना पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या संशयितांच्या व्हॉईस रेकॉर्डशी केली जात आहे. या मेसेजचा मूळ स्रोत शोधून काढण्यासाठी तांत्रिक पथकही कार्यरत आहे.
दरम्यान, नुकतीच अभिनेता तुषार कपूर यालाही अशाच स्वरूपाचा धमकीचा ऑडिओ मेसेज मिळाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणात ‘हॅरी बॉक्सर’ या नावाचा वापर करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. परंतु प्राथमिक तपासात तो बनावट कॉल असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली होती. दुसरीकडे, अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलीस बॉलिवूड कलाकारांना मिळणाऱ्या धमक्यांच्या प्रकरणांकडे अधिक सतर्कतेने पाहत आहेत. या सर्व घटनांमागे एकाच गुन्हेगारी टोळीची साखळी आहे की बनावट मेसेजद्वारे वसुलीचा प्रयत्न केला जात आहे, याचा निष्पक्ष तपास पोलीस करत असून कलाकारांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.







