मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) | मराठी चित्रपटाला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवा’चे दुसरे पर्व यंदा १५ ते १८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात रंगणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या महोत्सवात पाच जुन्या अभिजात चित्रपटांसह एकूण ४१ मराठी चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. तसेच चित्रप्रदर्शनासोबतच परिसंवाद, विशेष मुलाखती, मास्टरक्लासेस, ‘पुस्तक ते सिनेमा’ (बुक टू स्क्रीन) उपक्रम आणि तरुणांसाठी लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
यंदाच्या महोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली असून, महोत्सवाच्या माध्यमातून जमा होणारा सर्व महसूल राज्यातील दुष्काळ निवारणासाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला दिला जाणार आहे. यासाठी महोत्सवाचे नोंदणी शुल्क प्रतिव्यक्ती १०० रुपये ठेवण्यात आले असून, इच्छुकांसाठी ‘डोनर पास’ही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.







