प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकल यांचे निधन; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

बेलराज कलारिकल

कोची (वृत्तसंस्था) | मल्याळम चित्रपटसृष्टीतील तरुण दिग्दर्शक बेलराज कलारिकल यांचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं आहे. १७ ऑक्टोबर रोजी कोची येथील एका हॉटेलच्या खोलीत ते मृतावस्थेत आढळले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, नुकतीच प्रदर्शित झालेली ‘कॉफी स्क्वॉड’ ही वेब सीरिज त्यांच्या दिग्दर्शनातील पहिलीच कलाकृती होती.

बेलराज कलारिकल हे केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील मणिमाला येथील रहिवासी होते. ते कोची येथील एका हॉटेलमध्ये मालिकेचे दिग्दर्शक श्रीकांत यांच्यासोबत राहत होते. अनेकदा बेल वाजवूनही बेलराज यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बेलराज कलारिकल यांनी दिग्दर्शित केलेली ‘कॉफी स्क्वॉड’ ही वेब सीरिज १५ ऑक्टोबर रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली होती. या सीरिजचे चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते, तर एकूण ३६ भागांचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. दिग्दर्शन क्षेत्रात नुकतीच सुरुवात केलेल्या बेलराज यांच्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा होता. मात्र, त्यांच्या निधनाच्या बातमीने या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे.

बेलराज यांच्या निधनानंतर जिओ हॉटस्टारने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. “काही निरोप खूप लवकर येतात. बेलराज कलारिकल, तुमच्या आत्म्यास शांती लाभो,” अशा शब्दांत प्लॅटफॉर्मने आपल्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here