मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) | “प्रत्येक माणसाने कामाचा वेग वाढवलेला आहे, स्पर्धाही वाढलेली आहे. त्यामुळे स्मृतीआड गेलेल्या गोष्टींकडे माणसाचे दुर्लक्ष झालेले आहे. ‘कलाश्रम’ ही संस्था स्मृतीआड गेलेल्या कलावंतांचे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींचे स्मरण करून त्यांच्या नावाचे पुरस्कार देते, ही अत्यंत समाजहिताची गोष्ट आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी व निर्माते दिलीप जाधव यांनी केले. स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या ‘कलाश्रम’ संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला आयोजित केल्या जाणाऱ्या ‘अभियान सन्मान’ या उपक्रमाच्या ८१ व्या पुष्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर येथे हा भावनिक कार्यक्रम नुकताच पार पडला.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप जाधव यांनी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. “अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे चित्रपट आणि मालिकांमधील योगदान मोठे आहे. परंतु, ज्यावेळी त्यांनी मराठी नाटकात काम करायला सुरुवात केली, तेव्हा मला त्यांच्या नाटकासाठी व्यवस्थापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती,” अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
या संस्थेच्या वतीने कुठल्याही साली परंतु त्याच महिन्यात दिवंगत झालेल्या गुणीजनांचे व प्रज्ञावंतांचे स्मरण त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत केले जाते. त्यानुसार अभिनेत्री-निर्माती पद्मा चव्हाण, दिग्दर्शक-नाट्य प्रशिक्षक शिवदास घोडके, पत्रकार-निर्माते चंद्रकांत चव्हाण आणि ज्येष्ठ रंगकर्मी-सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वराडकर यांचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले. तसेच त्यांच्या नावाचे ‘दखलपत्र’ अभिनेत्री किशोरी आंबिये, लेखक-दिग्दर्शक-नाट्य प्रशिक्षक डॉ. मंगेश बनसोड, संपादक-गीतकार-संवाद लेखक राजेंद्र बोडारे आणि ज्येष्ठ रंगकर्मी-सामाजिक कार्यकर्ते अनिल कदम यांना प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रज्ञावंतांना या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते. याच अनुषंगाने लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या याच महिन्यातील स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या ‘कट्यावर काळजात घुसली’ या नाटकातील ‘मकरंद घेई छंद’ हे गाणे वादक व गायक डॉ. स्वरूप वाघ यांनी सादर केले.
तसेच स्मृतिदिनानिमित्त प्रत्येक महिन्याला अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा ‘कलाधिपती गणपती’ ही ७३ वी विनामूल्य स्पर्धा सामाजिक कार्यकर्ते शशिकांत निर्गुण आणि आदर्श गृहिणी तुळसा मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला प्रगती नार्वेकर आणि देवेंद्र मोरे यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रज्ञा भटकळ यांनी स्पर्धा समन्वयक म्हणून काम पाहिले. गीतकार-संगीतकार श्रीकृष्ण सावंत यांनी परिक्षकाची जबाबदारी पार पाडली. या स्पर्धेत ज्ञानेश चौधरी, सुनीता जगताप, शिल्पा व्होरा आणि सुप्रिया जामसांडेकर हे विजयी ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा काळे यांनी केले, तर याशिवाय सविता जाधव, प्रिया राजपूरकर, जयप्रकाश भोसले, वैशाली शेट्ये, हिरामण शेजवळ व प्रणाली दाभेकर यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष पत्रकार नंदकुमार पाटील आणि संचालिका नंदिनी पाटील यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.







