मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) | महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचा उत्सव असलेल्या ‘पु. ल. कला महोत्सव २०२६’ चा गुरुवारी (५ नोव्हेंबर) प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत दिमाखदार शुभारंभ झाला. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उद्घाटन सोहळ्यास सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर, सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक करंजीकर आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (NGMA) संचालक निधी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थितांना दीपावली आणि मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठी रंगभूमीची प्रयोगशीलता आणि पु. ल. देशपांडे यांचे साहित्य, संगीत व नाट्यक्षेत्रातील योगदान जतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बदलत्या काळाची गरज ओळखून कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी त्यांनी अकादमीमध्ये ‘स्क्रीन ॲक्टिंग’, ‘संगीत-नाटक-परफॉर्मन्स’ आणि ‘ॲप्रिसिएशन व क्युरेटिंग’ या तीन नवीन अभ्यासक्रमांची घोषणा केली.
यावेळी सचिव किरण कुलकर्णी म्हणाले की, “मराठी कला, नाटक आणि संस्कृतीचा वारसा जतन करणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. अकादमीचे दर्जेदार उपक्रम केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता देश-विदेशात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.” तर, संचालिका मीनल जोगळेकर यांनी उपस्थित मान्यवर आणि रसिकांच्या भरभरून प्रतिसादाबद्दल आभार मानले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी लिखित ‘ती दोघं’ हे अभिवाचन ठरले. विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या दोन तासांच्या कार्यक्रमाने रसिकांना खिळवून ठेवले. विद्याधर जोशी, सुप्रिया मतकरी विनोद, हृदया बोरकर, आदित्य कदम, योगेश उतरेकर, दीप्ती दांडेकर आणि स्वतः विजय केंकरे यांनी आपल्या दमदार संवादफेकीने आणि संवेदनशील अभिव्यक्तीने साहित्यकृतीतील नाट्यमयता जिवंत केली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या सादरीकरणाला दाद दिली.







