जळगाव (क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेत फिल्मी स्टाईलने टाकलेला धाडसी व सशस्त्र जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल करून जळगाव पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत सराईत गुन्हेगारांचा डाव पूर्णपणे उधळून लावला आहे.
पोलिसांनी ४ सराईत आरोपींना हत्यारे, वाहने आणि लुटलेल्या १००% मुद्देमालासह (सुमारे २७ किलो सोने व १२ लाखांहून अधिक रोख रक्कम) ताब्यात घेतले आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:४५ ते ३:१५ वाजेच्या सुमारास डोक्यात हेल्मेट व तोंडाला मास्क/रुमाल बांधलेल्या ४ अनोळखी इसमांनी भोकर येथील एसबीआय बँकेत बेकायदेशीर प्रवेश केला. आरोपींनी हातातील बंदूक, धारदार चाकू व लाकडी दांडक्याचा धाक दाखवून बँकेचे शाखा प्रबंधक श्री. जयेश दगडू राणे, कॅशियर रणजित मराठे, क्लार्क ऋषिकेश भगत, सुरक्षा रक्षक संदीप कोळी, शिपाई समाधान वराडे, एफओएस सुनिल शिरसाठ आणि शिपाई रघुनाथ ठाकरे या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली.
या दरम्यान बँकेचे सुरक्षा रक्षक संदीप कोळी यांनी प्रतिकार केला असता, आरोपी शंकर जासक याने त्यांच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने बंदुकीतून गोळी झाडली. त्यानंतर दरोडेखोरांनी बँकेच्या स्ट्राँग रूममधील लॉकरमधून १२,२६,५००/- रुपयांची रोख रक्कम आणि ३६,३६,२३,०००/- रुपये किमतीचे सुमारे २७ किलो वजनाचे तारण ठेवलेले सोन्याचे दागिने (८७१ बॅग), असा एकूण ३६,४८,४९,५००/- रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने बॅगेत भरून पळ काढला. भोकर SBI बँकेत घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेबाबत भोकरच्या महिला पोलीस पाटीलांचे सासरे संभाजी पवार यांनी सदर घटनेची माहिती दूरध्वनीवरून दुपारी ३:१७ वाजता पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना कळवली. घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवली. नांद्रा बीटचे अंमलदार, पोलीस पाटील व स्थानिक नागरिकांच्या मदतीने धरणगाव, चोपडा, यावल व अडावद मार्गांवर पाळत ठेवण्यात आली. पोलीस कंट्रोल रूमला अलर्ट करून डिकसाई येथे कडक नाकाबंदी लावली गेली.
नाकाबंदीदरम्यान संशयित वाहनाची झडती घेतली असता एक आरोपी अंकुश तुळशीराम पवार (चव्हाण) याला तसेच अंकुश श्रावण चव्हाण (वय ३०, रा. रामदेववाडी, ता. व जि. जळगाव) यांना पोनि शशिकांत पाटील, नांद्रा बीटचे हवालदार दीपक चौधरी, दिनेश चव्हाण, पोलीस प्रवीण कोळी आणि नागरिक सागर दिलीप कोळी, भगवान भावलाल कोळी यांच्या सहकार्याने मुद्देमालाच्या बॅगेसह जागीच पकडले. त्यांच्या चौकशीतून इतर आरोपी धरणगावच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळताच, नियंत्रण कक्षास व धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमाकांत उमाकांत गायकवाड यांना त्वरित कळवण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या स्टाफसह (हवालदार सत्यवान पवार, पोलीस मनोज पाटील आणि नागरिक चेतन पाटील, बन्सी पाटील यांच्या सहकार्याने) धरणगाव मार्गावर केलेल्या नाकाबंदीत उर्वरित आरोपी गजानन राजेंद्र पवार आणि शंकर रमेश जासक यांना मुद्देमालासह बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून अंकुश तुळशीराम पवार (चव्हाण) (रा. खापरखेडा, ता. खकनार, जि. बुरहानपूर) याच्यावर मुक्ताईनगर आणि जामनेर पोलीस ठाण्यात दरोड्याचे व आर्म्स अॅक्टचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच गजानन राजेंद्र पवार (रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव) याच्यावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल असून, शंकर रमेश जासक (रा. मन्यारखेडा, जळगाव) याच्यावर शनीपेठ पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (४), १०९(१), १२७(२), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) सह शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३/२५, ३/२७ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर धडक व कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. राहुल गायकवाड, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत पाटील, एपीआय नयन पाटील, धरणगाव पोस्टेचे प्रभारी अधिकारी उमाकांत गायकवाड, तसेच पोउनि बडगुजर, पोउनि जितेन्द्र वलटे, स.फौ. अतुल वंजारी आणि जळगाव व धरणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने व ग्रामस्थांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.







