भोकर येथे स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; तीन दरोडेखोर ताब्यात

स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेत शनिवारी दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली. पाच ते सहा दरोडेखोरांनी दुचाकीवरून येत बँकेत प्रवेश केला. त्यानंतर बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून रोख रकमेसह सोने लुटून नेले. एवढेच नव्हे तर बँक व्यवस्थापक आणि रोखपालाला मारहाण करून खुर्चीला बांधून ठेवले.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी बँकेत ग्राहकांची वर्दळ तुलनेने कमी होती. याच संधीचा फायदा घेत पाच ते सहा दरोडेखोर दुचाकीवरून बँकेत दाखल झाले. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवत धमकावण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना विरोध करण्याची संधी न देता बँकेतील रोख रक्कम आणि सोने जवळील बॅगांमध्ये भरून घेतले.

दरोड्यादरम्यान दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापक आणि रोखपालाला मारहाण केली. त्यानंतर दोघांनाही खुर्चीला बांधून ठेवले. बँकेतील इतर कर्मचाऱ्यांनाही बंदुकीचा धाक दाखवून दहशतीखाली ठेवण्यात आले. लुट केल्यानंतर सर्व दरोडेखोर दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले. दरोडेखोर बँकेतून पसार झाल्यानंतर घटनेची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, दरोडेखोर जळगावच्या दिशेने पळून जात असताना डिकसाई गावाजवळ काही ग्रामस्थांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. ग्रामस्थांनी त्यांना हटकले असता झालेल्या प्रकारात एक दरोडेखोर त्यांच्या ताब्यात सापडला. संतप्त ग्रामस्थांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. इतर ठिकाणी आणखी दोन दरोडेखोर पकडण्यात आले. त्यांच्याजवळील बॅगा देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या ताब्यात असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. मात्र, त्यांचे इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. भोकर येथील एसबीआय शाखेत झालेल्या या दरोड्यात दरोडेखोरांनी नेमकी किती रोख रक्कम आणि किती सोने लुटले, याचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. तालुका पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here