जळगाव (संपादक सुनिल पाटील) | भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाच्या एकात्मतेच्या जडणघडणीत ऐतिहासिक योगदान देणारे भारतरत्न, ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र भारतीय चलनी नोटांवर असावे, अशी आग्रही मागणी शेतकरीपुत्र तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत कोलते यांनी केली आहे. राष्ट्रीय एकता दिन आणि सरदार पटेल यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही अनोखी मागणी मांडली आहे.
‘देशाला कळू द्या! भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल!’ असा संदेश देत कोलते यांनी पंतप्रधानांना उद्देशून विनंती केली आहे की, भारतीय चलनी नोटांवर यापुढे सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र समाविष्ट करण्यात यावे. देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंड भारताच्या निर्मितीसाठी अहोरात्र झटणाऱ्या या महान राष्ट्रपुरुषाचा गौरव चलनी नोटांच्या माध्यमातूनही व्हावा, अशी तीव्र भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.
अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील शेकडो संस्थानांचे यशस्वी विलीनीकरण करून एकात्म व अखंड भारताची उभारणी करण्यात ऐतिहासिक भूमिका बजावली होती. त्यांच्या याच कार्याचा आणि राष्ट्रनिष्ठेचा परिचय देशातील प्रत्येक नागरिकाला व्हावा, तसेच देशवासीयांना आणि भावी पिढ्यांना त्यांच्या त्यागाची व योगदानाची सतत प्रेरणा मिळत राहावी, या प्रमुख उद्देशाने ही मागणी केल्याचे वसंत कोलते यांनी नमूद केले आहे.
देशभरात राष्ट्रीय एकता दिन अत्यंत उत्साहात साजरा होत असताना सरदार पटेल यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक आणि गौरवशाली सन्मान व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र भारतीय चलनी नोटांवर असावे, ही केवळ एक मागणी नसून राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाप्रती देशवासीयांच्या वतीने व्यक्त केलेली खरीखुरी कृतज्ञता आहे,’ अशी परखड भूमिका सामाजिक कार्यकर्ते वसंत कोलते यांनी या निमित्ताने मांडली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून देशभरातून या संकल्पनेचे स्वागत होत आहे.







