मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई भवानी संवर्धन वनक्षेत्रात बेकायदेशीर वृक्षतोड; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

मुक्ताई भवानी संवर्धन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई भवानी संवर्धन वनक्षेत्र (कुऱ्हा वडोदा) मधील हजारो हेक्टर घनदाट जंगल आणि वनसंपदा नष्ट करण्यात आल्याप्रकरणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी याप्रकरणी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्री. अशोक एस. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्र सन २०१४ मध्ये वन्यजीव प्राणी व पक्ष्यांसाठी राज्य शासनाने राखीव घोषित केले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत या प्रतिबंधित क्षेत्रातील सुमारे ३,००० हेक्टर (७,५०० एकर) घनदाट जंगलातील कोट्यवधी वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करून हा परिसर बोडखा करण्यात आला आहे.
सन २००६ नंतर बहुतांश वनदावे संपुष्टात आले असतानाही, गेल्या १६ वर्षांत सातपुडा परिसरातील सुमारे २४ हजार हेक्टर (६० हजार एकर) जमिनीवर बेकायदा अतिक्रमण करून वनसंपदा नष्ट करण्यात आल्याचा गंभीर दावा छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केला आहे.
जंगल बोडखे झाल्यामुळे वाघ, बिबटे आणि इतर दुर्मिळ वन्यजीवांचा हक्काचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाला आहे. परिणामी, अन्नाच्या शोधात बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी मुक्ताईनगर शहरापर्यंत पोहोचत असून यामुळे वाढत्या जीवितहानीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
सातपुड्यातील जंगलावर अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये मध्य प्रदेश व इतर परराज्यांतील बनावट लोकांचा मोठा सहभाग असून, काही स्थानिकांच्या पाठिंब्यामुळे हे लोक वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करत आहेत. तसेच बोगस कागदपत्रे व पुरावे शासकीय दप्तरी दाखल करून शासकीय वनजमीन बळकावली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणाची पाळेमुळे शोधून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने याची सखोल चौकशी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेमार्फत (CBI) झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कठोर पावले न उचलल्यास हरित लवादाकडे (Green Tribunal) दाद मागण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष अशोक एस. शिंदे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here