नशिराबाद आरोग्य केंद्रात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ; १ ते १९ वयोगटातील बालकांना मोफत गोळ्यांचे वाटप

नशिराबाद आरोग्य केंद्रात

जळगाव (तालुका क्राइम रिपोर्टर मनोज नाले) | सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा जळगाव अंतर्गत स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद (ता. जि. जळगाव) येथे २७ ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय जंतनाशक दिना’निमित्त “जंतापासून मुक्त, होतील मुले सशक्त” या मोहिमेचा रीतसर शुभारंभ करण्यात आला. लहान मुलांमधील कुपोषण आणि रक्तक्षय (ॲनिमिया) रोखण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

 

या शुभारंभ प्रसंगी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते, डॉ. अमन पटेल यांच्यासह आरोग्य सेवक सुनील ढाके व अरविंद गाढे प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते केंद्रात आलेल्या बालकांना जंतनाशक गोळी देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

शाळाबाह्य व अंगणवाडीतील मुलांनाही लाभ:

या मोहिमेअंतर्गत १ ते ६ वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना अंगणवाडीतून आणि ६ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळेतून जंतनाशक गोळी चघळून खाण्यासाठी मोफत दिली जात आहे. तसेच नोंदणी न झालेल्या आणि शाळाबाह्य असणाऱ्या सर्व मुला-मुलींना अंगणवाडी मार्फत या गोळ्यांचे वाटप केले जात आहे. मुलांमध्ये जंताच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण, सततचा थकवा आणि शारीरिक व मानसिक विकासात अडथळा निर्माण होतो. यावर प्रतिबंध घालण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

३ नोव्हेंबरला ‘मॉप अप’ दिन:

आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज २७ ऑक्टोबर २०२६ रोजी ज्या मुला-मुलींना काही कारणास्तव जंतनाशक गोळी घेता आली नाही, अशा वंचित राहिलेल्या सर्व बालकांसाठी ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘मॉप अप’ दिन आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी उर्वरित सर्व मुलांना गोळी दिली जाईल.

जंतप्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरात स्वच्छता ठेवणे, शौचालय वापरल्यानंतर हात स्वच्छ धुणे, नखे कापणे व चपलांचा वापर करणे आवश्यक असल्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. परिसरातील पालकांनी आपल्या १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना ही जंतनाशक गोळी आवर्जून द्यावी, असे आवाहन नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here