ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्याकडून डॉ. सुनील दादा पाटील यांच्या कादंबरीचा गौरव
जळगाव (संपादक सुनिल पाटील) | डिजिटल युगात मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी कुटुंबातील प्रत्यक्ष संवाद आणि भावनिक जवळीक कमी होत चालली आहे. अशा पार्श्वभूमीवर हरवत चाललेल्या कौटुंबिक संवादाला जोडणारी आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करणारी डॉ. सुनील दादा पाटील यांची ‘आईला निवृत्ती नाही’ ही कादंबरी एक अस्सल साहित्यिक दस्तऐवज ठरत आहे, असा गौरव ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांनी केला आहे.
कवितासागर साहित्य अकादमीचे संस्थापक संचालक डॉ. सुनील दादा पाटील यांनी शिक्षण आणि वाचन चळवळीतून सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणगुत्ती येथे त्यांनी उभारलेले ‘पुस्तकांचे घर’ आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवलेली फिरती वाचनालय चळवळ बालवाचकांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवून वाचनाची गोडी लावणारी ठरली आहे.
या पार्श्वभूमीवर साकारलेली ‘आईला निवृत्ती नाही’ ही कादंबरी ‘शांताबाई’ या मध्यवर्ती व्यक्तिरेखेभोवती फिरते. कुटुंबासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या, संकटांना संयमाने सामोरे जाणाऱ्या आणि घराला घरपण देणाऱ्या आईच्या त्यागाची व जबाबदाऱ्यांची वेध घेणारी ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. ओघवती भाषाशैली, दैनंदिन जीवनातील बारकावे आणि वाचकाला अंतर्मुख करायला लावणारे प्रसंग हे या ४०० पानांच्या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
नात्यांमधील हरवत चाललेला जिव्हाळा, वाढते अंतर आणि कौटुंबिक मूल्यांचे संवर्धन यावर प्रभावी भाष्य करणारी ही कादंबरी सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी दिशादर्शक ठरत असून, संजीवनी बळवंत भिंगारे यांनी याचे नेटके प्रकाशन केले आहे. बदलत्या समाजव्यवस्थेत आईचे महत्त्व आणि संस्कारांचा वारसा जपणारी ही कलाकृती वाचकांच्या पसंतीस उतरत आहे.







