एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कच्च्या रसायनाचा तेलंगणातील कारखाना उद्ध्वस्त; मिरा-भाईंदर गुन्हे शाखेची मोठी कारवाई

एमडी ड्रग्ज

आतापर्यंत गुजरात, उत्तर प्रदेशसह तीन कारखाने उद्ध्वस्त; २५ आरोपींना बेड्या, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

सातारा (जिल्हा प्रतिनिधी जगदीश शिंदे) | मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटवर मोठी कारवाई करत तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पाशमैलाराम येथे सुरू असलेला ड्रग्जचा कच्चा माल (केमिकल) बनवणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.

या छाप्यात पोलिसांनी २७ लाख रुपयांहून अधिक किमतीची ४४.६९९ किलोग्रॅम रासायनिक पावडर आणि प्रयोगशाळेचे साहित्य जप्त केले असून, या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत. नालासोपारा ते तेलंगणा धागेदोरे२४ जून २०२६ रोजी नालासोपारा (पूर्व) येथील प्रगती नगर परिसरातून तुळींज पोलिसांनी अविनाश उर्फ सोनू लोकनाथ अय्यर (वय २२) आणि रविकांत ओमप्रकाश राम (वय २३) या दोघांना ३ लाख ३६ हजार रुपये किमतीच्या ११२ ग्रॅम मेफेड्रॉनसह (एम.डी.) अटक केली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ कडे सोपवण्यात आला होता.
सखोल तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वी १९ आरोपींना अटक केली होती. तपासाचे धागेदोरे शोधत पथकाने यापूर्वी गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील संघान गाव आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराज (मेजा तहसील) येथील शेतजमिनींमध्ये सुरू असलेले एमडी ड्रग्जचे अवैध कारखाने उद्ध्वस्त केले होते. त्या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६९ किलो ८७१ ग्रॅम वजनाचे एमडी, २६० लिटर केमिकल आणि रोख रक्कम जप्त केली होती.
तपासात पुढे मुर्तुजा पात्रावाला, शुभम मोरे, सलीम डोला, साबीर देवळेकर आणि मोहम्मद सिद्दीकी या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे एनडीपीएस कायद्यांतर्गत प्रतिबंधित ‘२-ब्रोमो-४-मिथाईलप्रोपियोफेनोन’ हे केमिकल रमेश बाबु साके (रा. मेडचाल मलकाजगिरी, हैदराबाद) हा पाशमैलाराम (पठनचेरु, जि. संगारेड्डी, तेलंगणा) येथे अवैधपणे तयार करत असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या मदतीने २१ ऑक्टोबर २०२६ रोजी पाशमैलाराम येथील कारखान्यावर छापा टाकला. तेथून रमेश बाबु साके याला अटक करून २७ लाख ६ हजार ७४० रुपयांची ४४.६९९ किलो रासायनिक पावडर आणि प्रयोगशाळेचे साहित्य जप्त केले.
संपूर्ण गुन्ह्यात आतापर्यंत ड्रग्ज तयार करणारे, केमिकल पुरवणारे, तस्करी करणारे आणि आर्थिक व्यवहार पाहणारे अशा एकूण २५ आरोपींना नालासोपारा, मुंबई, कल्याण, नेरळ, जळगाव, गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा येथून अटक करण्यात यश आले आहे. ही धडक कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सपोनि प्रविण भोसले, दत्तात्रय सरक, पोउपनिरी उमेश भागवत व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here