सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी; टेम्पो-कारमधून एमडी ड्रग आणि गांजाची तस्करी उघडकीस

सोलापूर ग्रामीण पोलिसांची

टेंभुर्णीत ‘किया सेल्टोस’ कारमधून एमडी आणणारा सराईत जेरबंद; पंढरपूर तालुक्यातील रांजणीत शेतातून गांजा जप्त

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अंमली पदार्थ तस्करांविरोधात जोरदार मोहीम उघडत टेंभुर्णी आणि पंढरपूर परिसरात धडक कारवाया केल्या आहेत। कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावर टेंभुर्णी येथे ‘किया सेल्टोस’ कारमधून मेफेड्रोन (एमडी) ड्रगची विक्री करण्यासाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली। तर दुसऱ्या कारवाईत पंढरपूर तालुक्यातील रांजणी शिवारातील एका शेतातून बेकायदेशीर गांजा जप्त करण्यात आला। या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २५ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

टेंभुर्णी येथे सापळा रचून कारवाई; ५.५२ ग्रॅम एमडी जप्त
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व पथक पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे टेंभुर्णी येथील कुर्डूवाडी उड्डाणपुलाजवळ सापळा रचण्यात आला। सोलापूरकडून आलेल्या संशयित ‘किया सेल्टोस’ कारला (क्र. MH 47 AY 2136) अडवून तपासणी केली असता कारचालक गौतम अजित भोसले (वय ३८, रा. वेणेगाव, ता. माढा) याच्याकडून १६,५०० रुपये किमतीचे ५.५२ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.), कार, दोन मोबाईल, वजनकाटा व रोख रक्कम असा एकूण २१ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत आरोपीने ओडिशा येथून अंमली पदार्थ आणल्याची कबुली दिली असून त्याच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यायालयाने त्यास २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी गौतम भोसले याच्यावर यापूर्वीही दरोडा आणि एनडीपीएस अंतर्गत गंभीर गुन्हे नोंद आहेत.
दुसऱ्या एका कारवाईत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रांजणी गावाच्या शिवारात स्थानिक गुन्हे शाखा व पंढरपूर तालुका पोलिसांनी संयुक्त छापा टाकला। संशयित पंकेश मोहन दांडगे (रा. रांजणी) याच्या घराशेजारील गट शेताची झडती घेतली असता, तेथे भारे बांधून ठेवलेला ३ लाख ८१ हजार रुपये किमतीचा ७ किलो ६२० ग्रॅम गांजा मिळून आला.
अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त
सोलापूर ग्रामीण हद्दीत १ जानेवारी २०२६ पासून अंमली पदार्थविरोधी मोहिमेत एनडीपीएस कायद्यान्वये एकूण ९१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यापैकी २५ गुन्ह्यांत तब्बल २ कोटी ५१ लाख २७ हजार १५० रुपयांचे अंमली पदार्थ व वाहने जप्त करण्यात आली असून ६६ जणांवर अंमली पदार्थ सेवनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींनी व समाजाने सतर्क राहावे आणि अशा अवैध व्यवहारांची गुप्त माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here