सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांची बार्शीत मोठी कारवाई; स्पा सेंटरच्या आडून चालणारे कुंटणखाने, जुगार अड्डे उद्ध्वस्त

सोलापूर ग्रामीण पोलीस

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) |  बार्शी शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने एकाच वेळी मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या कुंटणखान्यांचा पर्दाफाश करून पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून जुगार अड्डे, गुटखा विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्यांनी स्वतः सहभाग घेत करमाळा विभागाच्या एएसपी श्रीमती अंजना कृष्णा, वाचक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण, सपोनि श्वेता चव्हाण तसेच क्युआरटी व आरसीपी पथकांच्या मदतीने बार्शी शहर व परिसरात छापे टाकले.

या मोहिमेत अनैतिक मानवी व्यापारासंदर्भात दोन स्पा सेंटर्सवर कारवाई करण्यात आली. बार्शी-लातूर बायपास रोडवरील ‘द मूनलाईट स्पा’ येथे दीपक गव्हाणे, पृथ्वीराज घोडके आणि केतन प्रकाश धामणेकर यांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकास मॅनेजर म्हणून ठेवून महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय चालवल्याचे निष्पन्न झाले. तर मौजे नागोबाचीवाडी शिवारातील ‘डिलक्स स्पा’ येथे व्यवस्थापक बाबाभाई खाजाबाई चौधरी व मालक आकाश काशिद हे महिलांकडून कुंटणखाना चालवत असल्याचे आढळले. या दोन्ही ठिकाणांहून पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, जुगार अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करून एकूण ४ लाख २० हजार १०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात सुभाष नगर (जावळे प्लॉट) येथील बंद घरातील कल्याण मटक्यावर छापा टाकून प्रदीप वाघमारे, सचिन नगरे यांच्यासह १२ जणांना ताब्यात घेत ३ लाख १४ हजार ४०० रुपयांची रोकड, लॅपटॉप, मोबाईल व वाहने जप्त केली. पोस्ट चौक परिसरातून दत्तात्रय गंधे, बालाजी सुतार यांच्यासह ६ जणांकडून ८४ हजार ८७३ रुपये, तर लता टॉकीज जवळील रोन पान शॉपजवळ मटका घेणारा सतीश माने याच्याकडून २० हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याव्यतिरिक्त खांडवी येथील शिवसाक्षी पान टपरीवर छापा टाकून २७ हजार १०४ रुपये किमतीचा बंदी असलेला गुटखा जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासनामार्फत केली जात आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या ३ जणांवर दारूबंदी कायद्यान्वये, तर ७ जणांवर पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध ही मोहीम अशीच सुरू राहणार असून संबंधितांवर ‘एमपीडीए’ व हद्दपारीसारखी कठोर प्रतिबंधक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here