सांगोल्यात राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; ८४ लाखांच्या मद्यासह कंटेनर जप्त, १ आरोपी अटकेत

राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) |  महाराष्ट्र पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक आचारसंहिता २०२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, पंढरपूर विभागाने एक मोठी धडक कारवाई केली आहे. मौजे अनकढाळ (ता. सांगोला, जि. सोलापूर) गावच्या हद्दीत मिरज ते सोलापूर महामार्गावरील टोलनाक्याजवळ अवैध बनावट देशी व परराज्यातील विदेशी मद्य वाहतुकीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून ६ चाकी कंटेनरसह तब्बल ८४ लाख ९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत टाटा कंपनीचा ६ चाकी कंटेनर (क्र. NL 01 AH 6823) ताब्यात घेण्यात आला आहे. या कंटेनरमधून बनावट देशी मद्य (९० मि.ली.): १०७१ बॉक्स (एकूण १०७१०० बाटल्या) – किंमत ₹४२,८४,०००/-, परराज्यातील विदेशी मद्य (‘रॉयल स्टॅग’ व्हिस्की १८० मि.ली.): १२ बॉक्स – किंमत ₹१,५५,५२०/- , इतर: १ मोबाईल फोन व कंटेनर असा एकूण ८४,०९,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर, सोलापूरच्या अधीक्षक भाग्यश्री पं. जाधव आणि उपअधीक्षक सौरभ बा. अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर क्र. २ (सांगोला) चे दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले यांनी ही कारवाई केली.

अवैध मद्य व्यावसायिकांना कडक इशारा!

“सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध मद्य धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. ग्रामीण आणि शहरी भागात गस्त वाढवण्यात आली असून यापुढेही अशीच कडक कारवाई सातत्याने सुरू राहील. अवैध व्यवसायात आढळणाऱ्यांवर अजामीनपात्र कलमांन्वये गुन्हे दाखल केले जातील.”

— भाग्यश्री पं. जाधव (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर)

या धडक कारवाईत निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, राम निंबाळकर, बापू चव्हाण, श्रद्धा गडदे तसेच जवान विजय शेळके, विनायक वाळुंजकर, तानाजी जाधव, गजानन जाधव, ए. बी. यशवंत, योगेश पाटील, प्रवीण पुसावळे, देविदास चौधरी, संजय पराडे आणि चालक रामचंद्र मदने यांनी सहभाग नोंदवला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले करत आहेत.

परिसरात अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असल्यास नागरिकांनी तात्काळ 18002339999 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 8422001133 या व्हॉट्सॲप क्रमांकावर माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here