इलेक्ट्रिक रोहित्र (डीपी) चोरीचे चार गुन्हे उघडकीस; ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

इलेक्ट्रिक रोहित्र

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) |  शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक रोहित्र (डीपी) चोरून नेणाऱ्या टोळीचा मंगळवेढा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून डीपी चोरीचे तब्बल चार गुन्हे उघडकीस आणले असून, ४ लाख २५ हजार रुपये किमतीचे १६ के.व्ही.ए. क्षमतेचे ४ रोहित्र जप्त केले आहेत.

 

मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथील शेतकरी अमित ज्ञानेश्वर मोरे यांच्या शेतातील १६ के.व्ही.ए. क्षमतेचा रोहित्र (डीपी) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी विद्युत वितरण कंपनीच्या मंगळवेढा ग्रामीण कार्यालयातील वायरमन अमोल हणमंत क्षीरसागर यांनी दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच मंगळवेढा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस नाईक ईश्वर दुधाळ यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दोन तासांच्या आत दिपक शिवाजी हेंबाडे (वय ३२, रा. नागणे गल्ली, मंगळवेढा) आणि ओम सुनिल शेजाळ (वय १८ वर्षे ९ महिने, रा. ढवळस, ता. मंगळवेढा) या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी साथीदारांच्या मदतीने मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी तीन ठिकाणी (गु.र.नं. ५०३/२०२६, ६३०/२०२६ आणि १०४८/२०२६) इलेक्ट्रिक रोहित्र चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख २५ हजार रुपये किमतीचे ४ रोहित्र हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यातील इतर फरार (पाहिजे) आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

ही यशस्वी कामगिरी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पंढरपूरच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे आणि मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे, पोलीस हवालदार सुधीर शिंदे, रविंद्र बाबर, पोलीस नाईक ईश्वर दुधाळ, पोलीस अंमलदार विनायक खंडागळे व शरद कदम यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. पुढील तपास पोलीस हवालदार रविंद्र बाबर, पोलीस नाईक ईश्वर दुधाळ आणि विनायक खंडागळे करत आहेत

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here